राज्यात मागील काही दिवसांपासून थांबलेला पाऊस(Heavy rains) पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. कोकण, मुंबई, ठाणे, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस पाऊस जोरात कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण, मुंबईत मुसळधार पाऊस :
मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांत आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात सततच्या पावसामुळे(Heavy rains) रस्ते बंद झाले आहेत, दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. धबधब्यांनी रोद्र रूप धारण केल्याने स्थानिक नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा, कन्हेर, राधानगरी धरणांत जोरदार आवक झाली असून, धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे वेणा आणि भोगवती नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
पुढील चार दिवस राज्यात पावसाचं वर्चस्व :
हवामान विभागानुसार, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागांत पाऊस पुढील चार दिवस सक्रीय राहणार आहे. विदर्भात देखील हलक्याशा पावसाचा अंदाज आहे.
तसेच खडकवासला धरण साखळीत एकूण १७.१५ टीएमसी म्हणजेच ५८.८३% पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी केवळ १६.६२% साठा होता. यंदा तुलनेत तिप्पट अधिक साठा जमा झाला आहे.
धरणनिहाय साठा असा आहे:
खडकवासला: 1.16 टीएमसी
पानशेत: 6.09 टीएमसी
वरसगाव: 8.13 टीएमसी
टेमघर: 1.76 टीएमसी