Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रउच्च शिक्षणानंतरही नोकरी न मिळाल्याने अभियंता तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

उच्च शिक्षणानंतरही नोकरी न मिळाल्याने अभियंता तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

नैराश्यात गेलेल्या 22 वर्षीय अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 6) सकाळी नऊच्या सुमारास चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारा चौक परिसरात उघडकीस आली.

 

आत्महत्येचे स्पष्ट कारण समजू शकले नसले, तरी नोकरी मिळत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

 

कुंदन संजय बडगुजर (22, मूळ रा. अर्थे, ता. शिरपूर, जि. धुळे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक अंकुश बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदन याने काही महिन्यांपूर्वी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते.

 

त्यानंतर नोकरीच्या शोधात तो पिंपरी-चिंचवड शहरात आला होता. सध्या तो बहिण दीपाली व दाजी जयेश काशिनाथ बडगुजर (रा. गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी, मूळगाव चोपडा, जि. जळगाव) यांच्यासोबत राहत होता. तो एका खासगी कंपनीत इंटर्नशिप करत होता.

 

दरम्यान, शनिवारी दीपाली आणि जयेश हे दोघे त्यांच्या मूळगावी गेले होते. रविवारी सकाळी त्यांनी कुंदनशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन सतत न उचलल्याने त्यांना शंका आली. त्यांनी शेजार्‍यांशी संपर्क साधून माहिती दिली.

 

शेजार्‍यांनी दरवाजा वाजवला; मात्र आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने काही नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला. आत प्रवेश करताच कुंदन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

 

घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कुंदन याला तातडीने पिंपरीतील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

 

मोबाइलमधील डेटाचाही तपास

 

चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आत्महत्येपूर्वी कुंदनने काही चिठ्ठी लिहून ठेवली आहे का, याबाबतही चौकशी केली जात आहे. आत्महत्येचे नेमके कारण निष्पन्न होण्यासाठी कुंदनच्या मोबाइलमधील डेटाचाही तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -