सासष्टी तालुक्यातील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल होण्याचा प्रकार घडल्याने दक्षिण गोव्यात खळबळ माजली आहे. विद्येचे मंदिर असलेल्या विद्यालयातील लाजिरवाण्या प्रकारामुळे लोक संतप्त झाले आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन आठवड्यांपासून हा अश्लील व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका खासगी संस्थेशी संलग्न असलेल्या या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःच हा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला आहे. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापनाला याबद्दल पूर्ण कल्पना असून पोलिसांत तक्रार केल्यास विद्यालयाची बदनामी होईल या भीतीने अजून या प्रकाराची पोलिसांत तक्रार करण्यात आलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सुमारे तीन महिन्यांपूर्वी घडल्याचा अंदाज आहे. बारावीच्या वर्गात शिकणार्या अल्पवयीन विद्यार्थी, विद्यार्थिनीने वर्गातच त्यांचे अश्लील चित्रिकरण केले. विशेष म्हणजे ज्यावेळी वर्गात हा अश्लील प्रकार घडला होता त्यावेळी इतर विद्यार्थीसुध्दा तिथे उपस्थित होते. त्या दोघांना कळू न देता वर्गातील काहीजणांनी मोबाईलवर चित्रिकरण केले. सध्या त्या उच्च माध्यमिक विद्यालयासह इतर शैक्षणिक संस्थामध्ये झपाट्याने या व्हिडिओ व्हायरल झाला असून ते अश्लील कृत्य करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेच्या गणवेशात असल्यामुळे त्या शैक्षणिक संस्थेच्या नावाचीही मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. यापूर्वी केपे तालुक्यातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलीच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. इयत्ता बारावीत शिकणार्या त्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते.
शिक्षण व्यवस्थेला काळिमा : अमिशा शरद
खून आणि बलात्कारासारख्या प्रकरणांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे. सासष्टी तालुक्यातील त्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वर्गात अश्लिल कृत्य करून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासला आहे. या घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे. आताच कारवाई न झाल्यास भविष्यात अशा स्वरूपाची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती नॅशनल इन्चार्ज, रियल हेल्प ब्युरो या सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी अमिशा शरद यांनी व्यक्त केली आहे.