शाळा वारंवार चुकवत असल्याच्या कारणातून आई-वडिलांनी रागवल्याच्या कारणातून बोरगाव (ता. चिकोडी) येथील यश अनिल पाचंगे (वय 15, रा. कुंभार मळा) या शाळकरी मुलाने आत्याच्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले.
ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
बोरगाव येथे अनिल पाचंगे कुटुंबीयांसह राहण्यास आहेत. त्यांचा मुलगा यश हा बोरगावातील विद्यासागर शाळेत आठवीमध्ये शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो वारंवार शाळेला जात नव्हता. या कारणातून वडील त्याला रागवले होते. त्यातच आज पुन्हा त्याने शाळेला जाणार नसल्याचे सांगितल्याने आईबरोबर त्याचा वाद झाला. त्यानंतर शाळेला जातो, असे सांगून तो निघून गेला. त्यांच्या घराजवळच असलेल्या त्याच्या आत्याच्या घरात आढ्याला कापडाने गळफास घेतला. ही घटना नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्याला खासगी रुग्णालयात व पुढील उपचारासाठी आयजीएममध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. याची वर्दी सचिन काशीनाथ पाचंगे यांनी दिली आहे. या घटनेने यशच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.