Saturday, July 26, 2025
Homeइचलकरंजीनांदणीत 'हत्तीण बचाव'साठी हजारोंचा मूक मोर्चा

नांदणीत ‘हत्तीण बचाव’साठी हजारोंचा मूक मोर्चा

नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तीण गुजरात येथील वनतारा हत्ती केंद्रात नेण्यास विरोध म्हणून समस्त जैन समाज व नागरिकांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता हजारोंच्या संख्येने एकत्र येत नांदणी येथे मूक मोर्चा काढला.

 

तसेच, नांदणी गाव बंद ठेवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. दरम्यान, ‘महादेवी’ हत्तिणीचा स्नेह जुळला आहे. त्यामुळे आम्ही हत्तीण देणार नाही, अशा तीव- भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.

 

स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला 1,200 वर्षांची परंपरा आहे. या मठाकडे 400 वर्षांपासून हत्ती आहे. एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना, प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले होते. त्यानुसार नांदणी येथील ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तिणीला गुजरात येथे दोन आठवड्यांत पाठविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याविरोधात नांदणी मठाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

 

याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या हत्ती केंद्राचे पथक गुरुवारी रात्री हत्तिणीला नेण्यासाठी आले असल्याचा समज निर्माण झाल्याने 4 ते 5 हजार नागरिक गोळा झाले आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हत्तिणीला नेऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यानंतर शुक्रवारी नांदणी येथे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नांदणी पंचक्रोशीतून हजारो सर्वधर्मीय नागरिकांनी या मोर्चात सहभागी होऊन हत्तिणीला आम्ही दुसरीकडे पाठवू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्याचबरोबर गाव बंद ठेवून ‘हत्तीण बचाव’साठी सर्वांनी पाठिंबा दिला.

 

नांदणी येथील गांधी चौकातून मूक मोर्चाला सुरुवात झाली. भरत बँक येथून बाजारपेठ, ग्रामपंचायत, कुरुंंदवाड रोड, भैरवनाथ मंदिर तेथून जयसिंगपूर मार्गावरील निशीधी येथे मोर्चा आला. यावेळी नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त करून हत्तिणीला आम्ही देणार नाही, असे सांगितले. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, सावकार मादनाईक, पृथ्वीराजसिंह यादव, आप्पासो लठ्ठे, शेखर पाटील, डॉ. सागर पाटील, अजय पाटील-यड्रावकर, युनूस पटेल, सागर शंभूशेट्टे, वैभव उगळे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक, महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी शिरोळ व जयसिंगपूर पोलिस ठाण्याचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -