ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने वेस्ट इंडिज विरूद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात विस्फोटक बॅटिंग केली. मॅक्सवेलने स्फोटक खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. विंडीजने ऑस्ट्रेलियासमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 बॉलआधी 3 विकेट्स राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 19.2 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 206 धावा केल्या. मॅक्सवेलने या दरम्यान 6 षटकारांच्या मदतीने वादळी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला.
ऑस्ट्रेलियाची विजयी धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात राहिली. कर्णधार मिचेल मार्श डावातील दुसऱ्याच बॉलवर भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यानंतर मॅक्सवेलने जोश इंग्लिस याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. जोश इंग्लिसच्या रुपात ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका लागला. जोशने 30 चेंडूत 51 धावा केल्या. जोशने या खेळीत 10 चौकार आणि 1 षटकार लगावला.
मॅक्सवेलचा झंझावात
जोश आऊट झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरुन ग्रीन या ऑलराउंडर जोडने तिसऱ्या विकेटसाठी 63 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर मॅक्सवेलच्या खेळीचा शेवट झाला. मॅक्सवेलने 18 बॉलमध्ये 261.11 च्या स्ट्राईक रेटने 47 धावा चोपल्या. मॅक्सवेलने या खेळीत 1 चौकार आणि 6 षटकार लगावले. मॅक्सवेलचं अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. मात्र त्याची ही खेळी ऑस्ट्रेलियासाठी अर्धशतकापेक्षा फार मोठी ठरली.
मॅक्सवेलची चाबूक बॅटिंग
मॅक्सवेलनंतर विंडीजने ऑस्ट्रेलियाला झटपट 2 झटके देत सामन्यात कमबॅक केलं. मिचेन ओवेन 2 धावांवर बाद झाला. तर कूपर कोनोली याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र कॅमरुन ग्रीन याने एरॉन हार्डी आणि झेव्हीयर ब्रार्टलेट या दोघांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवलं.
ऑस्ट्रेलियाचा विजयी चौकार
हार्डीने 23 धावा केल्या. तर बार्टलेटने 9 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर ग्रीनने सीन एबॉटसह ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवलं. कॅमरुन ग्रीन याने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा केल्या. ग्रीनने 35 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 55 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत सलग चौथा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 4-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवली.
पाचवा सामना सोमवारी
दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम सामना हा सोमवारी 28 जुलैला खेळवण्यात येणार आहे. आता विंडीज शेवटच्या सामन्यात विजय मिळवत लाज राखणार की ऑस्ट्रेलिया विजयी पंच लगावणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.