Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रChatGPT वर वैयक्तिक माहिती शेअर करुन सल्ला घेताय? तर सावधान !, OpenAI...

ChatGPT वर वैयक्तिक माहिती शेअर करुन सल्ला घेताय? तर सावधान !, OpenAI प्रमुखांनी दिला धोक्याचा इशारा

ChatGPT किंवा तत्सम एआय टूल्सना तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती शेअर करताय? त्याच्याकडून सल्ला मागताय?, तर सावधान…! कारण ते कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित नसल्याचे ओपन एआयचे (OpenAI) सीईओ सॅम ऑल्टमन यांनी म्हटले आहे.

 

ChatGPT किंवा तत्सम एआय टूल्सना तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती शेअर करून त्याचा थेरपिस्ट किंवा सल्लागार म्हणून वापर करत असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा इशारा दिला आहे. तुम्ही ChatGPTला तुमच्या अत्यंत वैयक्तिक गोष्टी सांगितल्या आणि नंतर त्या संदर्भात एखादा कायदेशीर वाद निर्माण झाला, तर आम्हाला त्या संभाषणांची माहिती न्यायालयात सादर करावी लागू शकते,” असे ऑल्टमन यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

 

कायदेशीर संरक्षणाचा अभाव

 

कॉमेडियन थियो व्हॉन यांच्या ‘दिस पास्ट वीकेंड’ पॉडकास्टमध्ये बोलताना ऑल्टमन म्हणाले, ” सध्या लोकांना AI ने पछाडलेले आहे. लोक त्यांच्या सर्वात वैयक्तिक गोष्टी ChatGPT ला सांगतात. विशेषतः तरुण पिढी त्याचा थेरपिस्ट, लाईफ कोच किंवा सल्लागार म्हणून वापर करते. पण सध्या, तुम्ही थेरपिस्ट, वकील किंवा डॉक्टरला सांगितलेल्या गोष्टींना कायदेशीर संरक्षण असते. मात्र, ChatGPT किंवा एआय टूल्ससाठी अशी कोणतीही कायदेशीर किंवा धोरणात्मक चौकट अद्याप तयार झालेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

संवाद न्यायालयात उघड होण्याची शक्यता

 

“जर एखाद्या व्यक्तीने ChatGPTला अत्यंत संवेदनशील माहिती दिली आणि नंतर त्यावरून कोर्टात केस झाली, तर आम्हाला ती माहिती सादर करावी लागू शकते. हे खूपच चुकीचे आहे, असं मला वाटतं,” असे अल्टमन म्हणाले. थेरपिस्ट किंवा डॉक्टरप्रमाणेच एआयसोबतच्या संवादालाही गोपनीयतेचे तितकेच संरक्षण मिळायला हवे,” अशी अपेक्षाही ऑल्टमन यांनी व्यक्त केली.

 

गोपनीयतेबाबत चिंता वाढल्या

 

ऑल्टमन यांच्या या वक्तव्यामुळे एआयवर भावनिक आधार, थेरपीसदृश संवाद किंवा जीवन मार्गदर्शन घेणाऱ्यांमध्ये गोपनीयतेबाबत चिंता वाढल्या आहेत. WhatsApp, Signal यांसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्समध्ये एंड-टू-एंड एनक्रिप्शन असले तरी, ChatGPT वरील संभाषणे OpenAI कर्मचारी प्रशिक्षण व सुरक्षेसाठी पाहू शकतात. OpenAI ने स्पष्ट केले आहे की, ChatGPT च्या मोफत आवृत्तीवरील चॅट्स ३० दिवसांत हटवले जातात, मात्र काही संवाद कायदेशीर किंवा सुरक्षेच्या कारणास्तव जास्त काळ ठेवले जाऊ शकतात. अल्टमन यांनी मान्य केले की, या गोपनीयतेच्या कमतरतेमुळे भविष्यात एआयवर वैयक्तिक संवाद साधण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.

 

ChatGPT वापरताना काळजी घ्या; टेक तज्ज्ञाचा सल्ला

 

एआयवर संवाद साधताना गोपनीयतेच्या मर्यादा लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. कायदेशीर संरक्षण नसल्याने, अत्यंत वैयक्तिक किंवा संवेदनशील माहिती शेअर करताना युजर्संनी काळजी घ्यावी, असा सल्ला टेक तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे ChatGPT चा जरा जपून वापर करणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -