नांदणीच्या महादेवी हत्तीनीने वनतारामध्ये पाऊल ठेवताच काय घडलं? समोर आला फोटो, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
नांदणी गावातील श्री जिनसेन मठामधील ‘माधुरी’ हत्तीला जामनगर (गुजरात) येथील वनतारा उद्यानामध्ये हलविल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजाने मोठा संताप व्यक्त केला आहे. या विरोधात तीव्र आंदोलन छेडले असून रिलायन्स कंपनीच्या पोस्टरला जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला. तसेच उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाजाने घेतला. नांदणीच्या माधुरी हत्तीणीला वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश सुरू आहे. अशातच वनताराने माधुरीचे स्वागताचे सोशल मिडीयावरती काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते, ते आता व्हायरल होत आहेत, त्यावरती नागरिकांनी संताप व्यक्त केला असून प्रश्न उपस्थित केले आहेत. माधुरीचा वनतारामधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये माधुरीच्या पायाला काहीतरी लागल्याचे दिसते असं नेटकरी म्हणत आहेत.
माधुरीच्या पायाला काय झालं?
माधुरीच्या मागच्या पायाला काहीतरी पट्टी लावल्यासारखं त्या वनताराच्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओवरती अनेकांनी कमेंट करत तिला पहिल्याच दिवशी दुखापत झाली, तिची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही. जो व्यक्ती त्या व्हिडीओमध्ये दिसतो आहे, त्याने माधुरीला चिमटीमध्ये पकडलं आहे, अशा प्रकारच्या कमेंट आता तिच्या व्हिडीओवरती येऊ लागल्या आहेत. माधुरी वनतारामध्ये पोहोचताच तिचा हा पहिलाच फोटो समोर आला आहे आणि त्यावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेंट करताना म्हटलंय की, पेटा वाल्यांनो आता तुम्हाला दिसत नाही का? आमच्या माधुरीला त्या माणसाने कसं हाताच्या चिमटीने पकडलं आहे. हीच काळजी आहे की त्या वनताराची, तर बाकी कमेंटमध्येही माधुरीच्या पायाला काय झालं? खूप वाईट झालं आहे, ती जिथली आहे तिथंच तिला ठेवायला हवं होतं, असंही काहींनी म्हटलं आहे. तो एक फोटो सोडला तर बाकी फोटो किंवा व्हिडीओमध्ये माधुरीचा तो पाय लपवला असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप ‘पेटा’ने केला. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर मुंबई प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची याचिका नंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळली, त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीण वनताराकडे जाणार आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयामुळे नांदणी ग्रामस्थ मात्र नाराज झाले. कोल्हापुरातील नांदणी इथला मठ जैन धर्मियांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातो. या मठात मागील 33 वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीणीचा सांभाळ करण्यात आला. मात्र याच हत्तीणीला गुजरातच्या वनतारा येथे नेण्यात आलं आहे. हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्याचे हायकोर्टानं दिल्यानंतर नांदणी ग्रामस्थांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं होतं, मात्र तिथही त्यांना निराशा मिळाली होती.
33 वर्षांची नाळ कायमची तुटली, गुजरातच्या वनताराकडे जाण्यासाठी रवाना
दरम्यान, Reliance Foundation च्या माध्यमातून स्थापित Vantara Wildlife Rescue & Rehabilitation Centre हे जगातील सर्वात मोठे प्राणी काळजी केंद्र मानले जाते. 3,500 एकर भूभागात पसरलेले हे केंद्र 3,300 प्रजातींतील सुमारे 10,000 प्राण्यांचे निवारा घर आहे, ज्यामध्ये व्याघ्र, मगर, अजगर, न्यूमथुन आणि हत्तीही समाविष्ट आहेत. 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रारंभ झालेल्या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 मार्च 2025 रोजी केले होते.