मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या जोडीने केलेल्या चाबूक बॉलिंगमुळे टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी इंग्लंडवर 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 85.1 ओव्हरमध्ये 367 धावांवर गुंडाळलं. यासह भारताने 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं आहे. भारताच्या विजयात मोहम्मद सिराज याने प्रमुख भूमिका बजावली. सिराजने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर प्रसिधने इंग्लंडच्या 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत सिराजला अप्रतिम साथ दिली. तर आकाश दीप याने 1 विकेट घेत दोघांना मदत केली.
इंग्लंडने 367 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी 6 विकेट्स गमावून 76.2 ओव्हरमध्ये339 धावा केल्या होत्या. त्यानंतर खराब प्रकाश आणि पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपवण्यात आला. त्यामुळे आता इंग्लंडला पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी 35 धावांची गरज होती. तर दुखापतग्रस्त ख्रिस वोक्स खेळणार असल्याने भारताला 4 विकेट्सची गरज होती. मात्र पाचव्या दिवशी मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या जोडीने 2-2 विकेट्स घेत इंग्लंडला गुंडाळलं आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
सामन्याचा धावता आढावा
इंग्लंडने टॉस जिंकला. इंग्लंडने भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. भारताने करुण नायर याच्या अर्धशतकाच्या जोरावर 224 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने 247 धावा करत 23 धावांची नाममात्र आघाडी घेतली. त्यानंतर यशस्वी जैस्वाल याचं शतक तर आकाश दीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या त्रिकुटाने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 396 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे इंग्लंडला 374 धावांचं आव्हान मिळालं.
इंग्लंडचा दुसरा डाव
मोहम्मद सिराजने इंग्लंडला तिसऱ्या दिवसातील शेवटच्या सत्रात 50 धावांवर पहिला झटका दिला. सिराजने चौदाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर (13.5) ओव्ह झॅक क्रॉली याला 14 धावांवर बाद केलं. यासह तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला.
त्यानंतर चौथ्या दिवशी प्रसिध कृष्णा याने बेन डकेट याला 54 धावांवर बाद करत इंग्लंडला दुसरा झटका दिला. सिराजने कर्णधार ओली पोप याला 27 धावावंर बाद केलं. त्यामुळे इंग्लंडची 3 बाद 106 अशी स्थिती झाली. त्यानंतर जो रुट याची साथ देण्यासाठी हॅरी ब्रूक मैदानात आला. भारताला चौथी विकेटही मिळाली मात्र एक चूक झाली. सीमारेषेवर सिराजने हॅरीचा 19 धावांवर कॅच घेतला. मात्र त्यानंतर सिराजचा पाय हा बाऊंड्री लाईनला लागला. त्यामुळे ब्रूकला जीवनदान मिळालं. हॅरीने याचा चांगलाच फायदा घेतला.
सिराजची एक चूक भारताला 92 धावांनी महागात पडली. ब्रूकने शतक ठोकलं. इतकंच नाही तर रुट-ब्रूक जोडीने 195 धावांची भागीदारी केली. भारताने इंग्लंडला 301 धावांवर चौथा झटका दिला. हॅरी ब्रूक 111 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे टीम इंडिया या सा मन्यातून पूर्णपणे बाहेर झाली होती.
मात्र त्यानंतर भारतीय संघाने जोरदार कमबॅक केलं. भारताने जेकब बेथल 5 आणि जो रुट याला 105 धावांवर आऊट केलं. त्यामुळे इंग्लंडची 6 आऊट 337 अशी स्थिती झाली. इंग्लंडने त्यानंतर 2 धावा जोडल्या. इंग्लंडची धावसंख्या यासह 339 अशी झाली. त्यानंतर खराब प्रकाश आणि पावसामुळे चौथ्या दिवसाचा उर्वरित खेळ वाया गेला. त्यामुळे इंग्लंडला पाचव्या दिवशी 35 धावा तर भारताला 3 विकेट्सची गरज होती.
जो रुट याने गरज पडली तर क्रिस वोक्स मैदानात येईल, अंस चौथ्या दिवशी म्हटलं.त्यामुळे भारताला विजयासाठी चौथ्या दिवशी 3 ऐवजी 4 विकेट्स घ्याव्या लागतील हे निश्चित झालं.
पाचव्या दिवसाचा थरार
जेमी ओव्हरटन आणि जेमी स्मिथ ही जोडी मैदानात आली. भारताकडून प्रसिध कृष्णा याने पाचव्या दिवसातील पहिली ओव्हर टाकली. जेमीने प्रसिधच्या बॉलिंगवर 2 फोरसह 8 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताच्या विजयाची आशा मावळली. मात्र सिराजने इंग्लंडच्या डावातील 78 आणि त्याच्या पाचव्या दिवसातील पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला सातवा झटका दिला. सिराजने जेमी स्मिथला 2 धावांवर विकेटकीपर ध्रुव जुरेलच्या हाती कॅच आऊट केलं. भारताने यासह कमॅबक केलं. सिराजने त्यानंतर जेमी ओव्हरटन याला 9 रन्सवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. प्रसिधने जोश टंग याला झिरोवर बोल्ड करत इंग्लंडला नववा झटका दिला.
फ्रॅक्चर हातासह क्रिस वोक्स
त्यानंतर फ्रॅक्चर झालेल्या हातासह क्रिस वोक्स मैदानात आला. वोक्सने गस एटकीन्सन याला चांगली साथ दिली. गसने निर्भीडपणे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. यात त्याने फटका मारला. आकाश दीप सीमारेषेपासून फार पुढे असल्याने त्याच्या हाताला लागून बॉल थेट बाहेर गेला. यासह इंग्लंडला आणि एटकीन्सनला 6 धावा मिळाल्या. त्यामुळे आता दोन्ही संघांच्या चाहत्यांची धाकधुक वाढली होती. त्यामुळे इंग्लंड जिंकणार की भारत जिंकणार? अशी उत्सूकता होती. मात्र इंग्लंडला 7 धावा हव्या असताना सिराजने गसला 17 धावांवर बोल्ड केलं. गस आऊट होताच इंग्लंडचा डाव आटोपला. भारताने यासह हा सामना जिंकला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधत इंग्लंड दौऱ्याचा शेवट विजयाने केला.