गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिक्षण विभाग, या विभागाने घेतलेले निर्णय चांगलाच चर्चेचा विषय ठरलेला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्यात चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर जनभावना लक्षात घेऊन सरकाने हिंदी सक्तीचे सर्वच शासन निर्णय रद्द करून टाकले. आता हा वाद मागे पडलेला असताना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा नवा घोळ समोर आला आहे. आता इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एकच कविता असल्याचं समोर आलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
हे प्रकरण नागपुरातून समोर आले आहे. येथे इयत्ता पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता शिकण्यासाठी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे दोन्ही इयत्तांची पुस्तकं समोर आली आहेत. या दोन्ही पुस्तकांत एकच कविता छापून आली आहे. आता हा प्रकार मुद्दामहून करण्यात आलाय की यामागे काही तांत्रिक अडचण होती, हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही.
कवितेचा प्रत्येक शब्द सारखाच
इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पुस्तकात 28 क्रमांकाच्या पानावर Birds can Fly ही कविता देण्यात आली आहे. हीच हुबेहुब कविता इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात पान क्रमांक 16 वर छापून आली आहे. या दोन्ही पुस्तकातील कवितांचा प्रत्येक शब्द सारखाच आहे. फक्त रंग आणि चित्रांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
पालकांकडून उपस्थित केला जातोय प्रश्न
प्रत्येक इयत्तेचे पुस्तक छापण्यासाठी एक समिती नेमलेली असते. पाठ्यपुस्तकात कोणते धडे असावेत किंवा कोणत्या कविता असाव्यात याचा अभ्यास या समितीकडून केला जातो. असे असतानाही इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीच्या पुस्तकात एकच कविता छापून आल्याने नेमका काय अर्थ काढायचा? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, आता दोन इयत्तांच्या इंग्रजी पुस्तकात एकच कविता छापून येणे ही प्रिंटिंग चूक असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.