वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ६७ लाख ७६ हजार रुपयांचा धनादेश आमदार राहुल आवाडे यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सुपूर्द केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढदिवस दिनी कोणताही फलक, बॅनर न लावता अथवा जाहिरातबाजी न करता अनावश्यक खर्चाला फाटा देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून शासकीय योजनेत समावेश नसलेल्या विविध प्रकाराच्या आजारांवरील उपचारासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार त्यांची सामाजिक भानाची संकल्पना कृतीत उतरविण्यात आली.
सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासह प्रत्येक सामाजिक कार्यात मदतीचा हात देणाऱ्या हुपरी-यळगुड (ता. हातकणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ६७ लाख ७६ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देत धनादेश मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे सुपूर्द केला.