न्यू शाहूपुरी येथील अनंत प्रेस्टीज संकुलात तिसर्या मजल्यावर राहणार्या डॉ. अनिता अरुण परितेकर (58) यांचा फ्लॅट भरदिवसा फोडून मुलाच्या लग्नासाठी खरेदी केलेल्या 50 तोळे दागिन्यांसह रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला.
सोमवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी नाकाबंदी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम सुरू केली आहे. न्यू शाहूपुरी येथील मध्यवर्ती भागात घडलेल्या प्रकारामुळे भीतीचे सावट पसरले आहे.
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात मेडिसिन विभागाच्या अधिष्ठाता म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. परितेकर यांचा फ्लॅट फोडून सुमारे 55 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. न्यू शाहूपुरीसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. बंद फ्लॅटची रेकी करून सराईत चोरट्यांनी हे कृत्य केले असावे, असा संशय पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी व्यक्त केला.
पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, सोमवारी सकाळी 11 ते 3 या कालावधीत हा प्रकार घडला असावा, असा संशय आहे. डॉ. परितेकर दाम्पत्य मुलासह सकाळी बाहेर पडले. त्यामुळे फ्लॅट बंद होता. फ्लॅटमध्ये कोणीही नसल्याचे साधून चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजावरील कडी-कोयंडा उचकटून प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाट, बॅगांचा शोध घेऊन 25 हजाराची रोकड तसेच साडेतीन तोळ्याचा राणीहार, पाच तोळे वजनाच्या दोन सोनसाखळ्या, दीड तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, तीन तोळ्याच्या बांगड्या, तीन तोळ्याच्या चार बांगड्या, पाच तोळ्याचे कानातील टॉप्स, सहा तोळ्याच्या कानातील रिंगा, अर्धा तोळ्याचे झुबे, सव्वा तोळे वजनाच्या सोन्याच्या आठ अंगठ्या, सोन्याचे पेंडल असे 50 तोळ्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे पोलिसांनी सांगितले.
घरकाम करणार्या महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. महिलेने परितेकर यांच्या मुलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील, उपनिरीक्षक आकाश जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. डॉ. अनिता परितेकर यांनी रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.