लग्न करणं आणि मुलं जन्माला घालणं हा कुठल्याही व्यक्तीचा आपला व्यक्तिगत निर्णय असतो, लग्न करण्यापूर्वी किंवा एखादं मुलं जन्माला घालण्यापूर्वी संबंधित व्यक्ती आधीच सर्व तयारी करत असतो, लग्न झाल्यानंतर आपल्याला किती खर्च येऊ शकतो, जर मुलं जन्माला आलं तर त्याच्या पालन पोषणाचा खर्च आपण करू शकतो का? या सर्व गोष्टीचा त्याला आधीच अंदाज असतो. मात्र आता तैवान सरकारनं त्यांच्या देशातील नागरिकांसाठी एक योजना सुरू केली आहे, या अंतर्गत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाची जबाबदारी आता तेथील सरकार घेणार आहे. तसेच महिला गर्भवती असल्यापासून ते मुलं जन्माला येईपर्यंत होणारा सर्व खर्च देखील येथील सरकार संबंधित दाम्पत्याला देणार आहे.
तैवान सध्या एका वेगळ्याच समस्याचा सामना करत आहे, तैवानमध्ये जन्मदर प्रचंड प्रमाणात घटला आहे. त्यामुळे येथील सरकार जन्मदर वाढवण्यासाठी प्रोहत्साहन देत आहे. तैवानमधील जे दाम्पत्य मुलं जन्माला घालण्यासाठी IVF ट्रीटमेंटची मदत घेणार आहे, अशा दाम्पत्याला तैवान सरकारकडून सहा लाख रुपये मिळणार आहेत.तैवानमध्ये जन्मदर कमी झाल्यामुळे मनुष्यबळामध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे, लोकसंख्या वाढवून, मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी येथील सरकारनं हे पाऊलं उचललं आहे.
आतापर्यंत तैवानमधील जे नागरिक IVF चा वापर करून मुलांना जन्म देत होते, त्यांना सरकारकडून मदत म्हणून तीन लाख रुपये देण्यात येत होते. मात्र आता यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. या प्रस्तावाला लवकरच तेथील मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर अशा प्रत्येक दाम्पत्याला सरकारकडून प्रत्येकी सहा लाख रुपयांची मदत मिळणार आहे, हा तेथील नागरिकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
तैवान, जपान, आणि दक्षिण कोरियासारख्या देशात लोकसंख्या प्रचंड प्रमाणात कमी होत आहे, या देशात जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त वाढल्यानं लोकसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे या देशांमध्ये मनुष्यबळाची प्रंचड प्रमाणात कमतरता जाणवत आहे.तसेच या देशातील जे तरुण आहेत, ते लग्न आणि मुलं यापासून दूर राहण्याचा निर्णय घेत असल्यानं अशा देशांमध्ये आता तरुणांना लग्नासाठी तसेच मुलं जन्माला घालण्यासाठी आर्थिक प्रोहत्साहन दिलं जात आहे.