‘वनतारा’मध्ये आणलेल्या महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीणीसह इतर हत्तींना त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठवण्यासाठी देखरेख समिती स्थापन करण्याची मागणी करणारी याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
ही याचिका पूर्णपणे अस्पष्ट असल्याची टिप्पणी न्यायालयाने यावेळी केली. न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती पी. बी. वरळे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या वकिल सी. आर. जया सुकिन यांना सांगितले की, त्यांनी याचिकेत ‘वनतारा’ला प्रतिवादी म्हणून जोडले नाही. तरी देखील ‘वनतारा’वर आरोप करत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने याचिकेत वनताराला पक्षकार म्हणून जोडण्यास सांगितले. याप्रकरणी पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुकिन यांच्या याचिकेसोबत अशाच प्रकारची एक याचिका देखील जोडली. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या खंडपीठासमोर यापूर्वीच उल्लेख करण्यात आला होता.
दुसऱ्या याचिकेत ‘वनतारा’मध्ये बंदिस्त असलेल्या हत्तींना त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी परत आणण्यासाठी आणि ‘वनतारा’मधील सर्व वन्य प्राणी, पक्ष्यांना जंगलात सोडण्यासाठी एक देखरेख समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.