मिरजेत गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी व महापालिकेच्या निषेधार्थ पाण्याने भरलेल्या खड्ड्यात झोपून आंदोलन करण्यात आलेआठवड्याभरात गणरायाचे आगमन होणार आहे. मात्र, मिरजेत अनेक चौकांत रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
मिरज शहरात चारशे सार्वजनिक मंडळांच्या गणेश आगमनाची मिरवणूक निघते, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मिरवणुकीला अडथळा होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी व महापालिकेच्या निषेधार्थ रिपाइं आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी मिरजेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाचे साचलेल्या पाण्यात झोपून अनोखे आंदोलन केले.
महापालिकेने तातडीने रस्ते दुरुस्ती करावेत, अशी मागणी हत्तेकर यांनी केली. दोन दिवसांत रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा आनंदा हत्तेकर यांनी दिला आहे.