राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. ही निवडणूक लक्षात घेता राजकीय पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक पादाधिकाऱ्यांना प्रचाराचं काम चालू करा असे आदेश दिले आहेत. मनसे या पक्षानेही या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी चालू केलेली असताना दुसरीकडे नेतेमंडळीही आपली सोय पाहून पक्षांतर करताना दिसत आहेत. काही पदाधिकारी, नेते पक्षविरोधी कारवाया करताना दिसत आहेत. मनसे पक्षातही काही ठिकाणी असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे.
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बडतर्फीचा आदेश
पक्षाच्या या कारवाईबाबत अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत. तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांचीही नावे आहेत. हा आदेश जारी करताना सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे. तरी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकूण चार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
गेल्या काही दिवसांपासून कोकणात राज ठाकरेंच्या पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. मनसेचे कोकण संघटक आणि राज्य सरचिटणीस वैभव खेडकर हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. त्यांनी नुकतेच मंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. हीच बाब लक्षात घेता मनसेने खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सोबतच अविनाश सौंदलकर, संतोष नलवडे, सुबोध जाधव यांनाही पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. आपण पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज टाकरे यांच्या आदेशानुसार तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले आहे, असे कारण या पत्रात देण्यात आले आहे.
वैभव खेडेकर भाजपात जाणार? मनसेला काय फटका बसणार?
वैभव खेडेकर हे कोकणातील चर्चेत असेलेले नाव आहे. कधिकाळी ते राज ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी मनसेच्या तिकिटावर 2014 साली दापोली मतदारंसघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. खेड नगरपरिषद निवडणून आणण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यांनी खेडचे नगराध्यक्षपदही भूषवलेले आहे. त्यामुळे खेडेकर हे थेट भाजपात जाणार असल्याच्या शक्यतेमुळे या ठिकाणी मनसेला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा तोटा मनसे आता कसा भरून काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.