मूलं ही आई-वडिलांच्या म्हातारपणाचा आधार मानली जातात. मात्र मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका निवृत्त डीएसपींचा पैशासाठी त्यांच्याच कुटुंबाने छळ केला
गावकऱ्यांनी हा छळ मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. यानंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निवृत्त डीएसपी प्रतिपाल सिंह यादव यांना त्यांची पत्नी आणि मुलांनी दोरीने बांधून मारहाण केली. एक मुलगा त्यांच्या छातीवर बसला तर दुसऱ्याने त्यांचे हात-पाय बांधले. त्यांना जबरदस्तीने सोबत घेऊन गेले. गावकऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रतिपाल यांची मुलांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. निवृत्तीनंतर मिळालेल्या लाखो रुपयांवरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे.
प्रतिपाल सिंह गेल्या १५ वर्षांपासून त्यांची पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत होते. पत्नीचा दावा आहे की, त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही आणि ते वेडे आहेत, म्हणून ते त्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी आले होते. यादव मार्च २०२५ मध्ये श्योपूर येथून निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पिछोरचे एसडीओपी प्रशांत शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिकडेच निवृत्त झालेले डीएसपी प्रतिपाल सिंह यांना त्यांची पत्नी माया यादव आणि मुलं आकाश आणि आभास यांनी मारहाण केली. त्यांचा मोबाईल आणि एटीएम हिसकावून घेण्यात आलं. प्रतिपाल सिंह निवृत्तीनंतर चांदवानी गावात राहत आहेत. माहिती मिळताच तात्काळ कारवाई करण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.