आशिया कप 2025 स्पर्धेसाठी सर्वच संघ सज्ज आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर आशिया कप स्पर्धेनिमित्ताने मैदानात उतरणार आहे. तर इतर संघ टी 20i मालिका खेळून या स्पर्धेत उतरणार आहेत. आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना हा 9 सप्टेंबरला होणार आहे. यूएईकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. या स्पर्धेसाठीची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. ही अशी लगबग सुरु असताना भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूने मोठी घोषणा केली आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूने संघ बदलणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा खेळाडू आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये नव्या टीमकडून खेळताना दिसू शकतो. या खेळाडूने आपल्या क्रिकेट असोसिएशनकडे दुसऱ्या संघासोबत खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितलं आहे. नियमांनुसार, दुसर्या संघाकडून खेळण्यासाठी पहिल्या संघाकडून एनओसी घेणं बंधनकारक असतं. विशेष म्हणजे या खेळाडूने गेल्या वर्षीही टीम बदलण्याची घोषणा केली होती. मात्र 5 महिन्यांनी हा निर्णय बदलला होता. तो खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
हनुमा विहारी याची मोठी घोषणा
हनुमा विहारी देशांतर्गत क्रिकेटमध्ये नव्या संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. हनुमा आंध्र क्रिकेट असोसिएशनसाठी खेळत होता. हनुमाने एसीएकडे एनओसीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमा आता त्रिपुराकडून खेळू शकतो. हनुमाला त्रिपुराच्या नेतृत्वाची जबाबदारीही मिळू शकते.
हनुमा विहारी याने काय म्हटलं?
“मी बदलाबाबत विचार करत आहे. त्रिपुराकडून मला खेळण्याबाबत विचारणा करण्यात आली”, असं हनुमाने क्रिकबझसोबत बोलताना म्हटलं. तसेच हुनमाने एनओसीसाठी अर्ज केला असल्याचंही सांगितलं.
हनुमा विहारी याची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी
हनुमाला देशातंर्गत क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. हनुमाला 131 फर्स्ट क्लास आणि 97 लिस्ट ए सामने खेळण्याचा अनुभव आहे. हनुमाने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 24 शतकं आणि 51 अर्धशतकं केली आहेत. तसेच हनुमा आता फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10 हजार धावांच्या उंबरठ्यावर आहे. हनुमाने आतापर्यंत 9 हजार 585 धावा केल्या आहेत.
हनुमा विहाराची कसोटी कारकीर्द
तसेच हनुमाने भारताचं 16 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. हनुमाने या 16 सामन्यांमध्ये 839 धावा करण्यासह 5 विकेट्सही घेतल्या आहेत.