धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी मांजरा नदीने यंदाच्या पावसाळ्यात प्रचंड रौद्ररूप धारण केलं. १४ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या दोन्ही काठावर पूरस्थिती निर्माण झाली होती.
या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात खोंदला येथील ६५ वर्षीय शेतकरी सुब्राव शंकर लांडगे हे शेतातून घरी येताना वाहून गेले होते. शेतकरी लांडगे यांना शोधण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने शोधकार्यास अडथळा निर्माण होत होता. सुब्राव लांडगे पाण्यातून सुरक्षित बाहेर येतील, त्यांचा ठावठिकाणा लागेल, अशी कुटुंबीय व गावकऱ्यांची आशा होती. मात्र नदीच्या प्रचंड प्रवाहापुढे ती आशा दिवसेंदिवस फोल ठरत गेली. अखेर दहा दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला.
विधी अंतिम टप्प्यात असतानाच सकाळी मृतदेह सापडला
घटनेनंतर १० दिवसांनी, रविवारी २३ ऑगस्ट रोजी नातेवाईक आणि गावकरी सुब्राव लांडगे यांचा दहावा विधी करण्यासाठी मांजरा नदीकाठी जमले होते. लांडगे यांचा दशक्रिया विधी अंतिम टप्प्यात असतानाच सकाळी लाखा (ता. केज) येथील सोयाबीनच्या शेतात मृतदेह दिसल्याची बातमी आली. स्थानिक शेतकरी संजीवन वाघमारे यांनी हा मृतदेह पाहताच तात्काळ पोलिसांना कळवलं. क्षणभर गावकऱ्यांना विश्वासच बसत नव्हता. मात्र मृतदेह खोंदला गावातीलच सुब्राव लांडगे यांचाच असल्याचं स्पष्ट झालं. दहाव्याचे विधी करत असतानाच मृतदेह सापडल्याची बातमी ऐकून कुटुंबाने आक्रोश केला.
मृतदेह न मिळाल्याने शोधमोहीम थांबवावी लागली होती
सुब्राव लांडगे हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी प्रशासनाकडून मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. तात्काळ एनडीआरएफचे जवान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तसंच पोलीस यंत्रणा यांनी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली होती. नदीकाठ, खेड्यापाड्यांत, पूलाखालून, लहान – मोठ्या खड्ड्यात प्रत्येक ठिकाणी तपासणी करण्यात आली होती. शोधासाठी बोटींचा आणि ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर झाला होता.
मात्र सलग दोन-तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतरही लांडगे यांचा काहीच पत्ता लागला नाही. नदीच्या एका बाजूला कळंब तालुका तर दुसऱ्या बाजूला बीड जिल्ह्यातील केज तालुका असल्याने दोन्हीकडे पथकं सतत शोध घेत होती. परंतु मृतदेह न मिळाल्याने शोधमोहीम थांबवावी लागली होती.
पोलिस पंचनामा मृतदेहावर अंत्यसंस्कार
घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. त्यानंतर चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन शवविच्छेदन केलं. त्यानंतर सायंकाळी गावात लांडगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.