मुंबईतील लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी दररोज असंख्य भाविक गर्दी करतात. मुखदर्शनाच्या आणि नवसाच्या रांगेतून भाविक राजाचं दर्शन घेत असतात. त्यातच मधे कोणी सेलिब्रिटी आले तर त्यांना व्हीआयपी वागणूक दिली जाते आणि थेट लालबागचा राजाच्या चरणी नेलं जातं. असं असलं तरी अनेक सेलिब्रिटींचे गर्दीत संघर्ष करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी आणि प्रज्ञा जैयस्वाल यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाविकांच्या गर्दीत संघर्ष करत या दोघी अभिनेत्री राजाच्या चरणापर्यंत जाताना दिसत आहेत. त्या गर्दीत प्रियांका खूप अन्कम्फर्टेबल झाल्याचं दिसून आलं. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट जाणवत होते. बरीच धक्काबुक्की आणि ढकलाढकली झाल्यानंतर अखेर एक कार्यकर्ता त्यांना राजापर्यंत घेऊन जातो.
प्रियांका आणि प्रज्ञाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘दीदीला व्हीआयपी दर्शन मिळालं, पण त्यात झेड प्लसवाला सबस्क्रीप्शन नव्हता’, असा उपरोधिक टोला एकाने लगावला. तर ‘सर्वसामान्य भाविकांचीही हीच अवस्था होते’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘यापेक्षा सर्वसामान्य रांगेतून माझं दर्शन चांगल्या पद्धतीने झालं, ही कसली व्हीआयपी रांग’, असा टोमणा नेटकऱ्यांनी मारला आहे.
याआधी अभिनेत्री जान्हवी कपूरसोबतही असंच काहीसं घडलं होतं. ‘परम सुंदरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लालबागचा राजाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. त्यावेळी भाविकांच्या गर्दीतून वाट काढत पुढे जाताना जान्हवीच्या चेहऱ्यावरील संकोचलेपणा, असहजपणा स्पष्ट दिसत होता. यावरूनही नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. जान्हवी पहिल्यांदाच अशा गर्दीचा सामना करतेय, परंतु असंख्य भारतीय महिलांसाठी हे रोजचं आहे, असं नेटकऱ्यांनी म्हटलं होतं.
मुंबईतील लालबागचा राजा अनेकांसाठी श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत राजाच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येतात. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीही मोठ्या संख्येने राजाची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याच्या पायावर डोकं टेकवून आशीर्वाद घेण्यासाठी येतात. लालबागचा राजाची गर्दी हा दरवर्षी चर्चेचा मुद्दा असतो.