यावल येथील बाबूजीपूरा भागातील ६ वर्षीय बालकाच्या खून प्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मोहम्मद हन्नान खान मज्जिद खान (वय ६) हा मुलगा ईदच्या दिवशी शुक्रवारी ५ रोजी संध्याकाळी बेपत्ता झाला होता. त्याचा शोध परिवार आणि ग्रामस्थ घेत होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ११ वाजता शेजारच्या घरात दुसऱ्या मजल्यावर जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. यावेळी पोलिसांनी चौकशी करून संशयित आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला (वय २२) याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केला असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
घरच्यांशी असलेल्या जुन्या वादातून हन्नान शेख याला पहिले गळा दाबून ठार मारले. नंतर जाळून टाकण्याचा प्रयत्न संशयित आरोपीने केला अशी प्राथमिक माहिती पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली आहे. याप्रकरणी सुरुवातीला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता हन्नानचे आजोबाच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे यावल तालुका जिल्हा हादरला आहे. यावल पोलीस पुढील तपास करीत आहेत.