कळंबा (ता. करवीर) येथील मनोरमा कॉलनीत झालेल्या गॅस पाईपलाईन स्फोटातील गंभीर जखमी प्रज्वल अमर भोजणे (वय साडेपाच वर्षे) याचा अखेर बुधवारी (दि. 10) मृत्यू झाला. आगीत भाजलेल्या प्रज्वलने तब्बल 16 दिवस मृत्यूशी झुंज दिली.
मात्र, त्याची झुंज अयशस्वी ठरली. या चिमुकल्याची लढाई संपली आणि त्याचा नाजूक जीव शेवटी थांबला. प्रज्वलच्या मृत्यूने एका कुटुंबाचा श्वास संपला. या बातमीने कळंबा परिसरात हळहळ व्यक्त झाली.
दरम्यान, 25 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेतील प्रज्वलची आई शीतल भोजणे (वय 29) यांचा 26 ऑगस्टला मृत्यू झाला. आजोबा अनंत भोजणे (वय 60) यांचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. तर प्रज्वलची बहीण ईशिका (वय 3) हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुःखाच्या काळोखात आशेची एकच ज्योत उरली आहे ती म्हणजे चिमुकली ईशिका. तिच्या हसर्या चेहर्यात आजही आई, भाऊ आणि आजोबांचा गोडवा सामावलेला आहे. मात्र तिच्या आयुष्याला आता उभारी देणे, आधार देणे आणि या जखमा भरून काढणे हे समाजाचे मोठे कर्तव्य ठरणार आहे.
कळंबा परिसरात 26 ऑगस्टच्या रात्री उशिरा झालेल्या गॅस पाईपलाईन स्फोटाने भोजणे कुटुंब उद्ध्वस्त झाले. एका क्षणात संपूर्ण घर हादरून गेले. जीवनाच्या धाग्यावर झगडणारे चार जीव मरणाशी झुंज द्यायला लागले. त्यात आई आणि मुलांच्या डोळ्यांतून फुलपाखरासारखी उडणारी स्वप्ने चिरडली गेली. वडीलांच्या आठवणीत आता फक्त तीन वर्षांची ईशिका शिल्लक आहे. तिच्या भोवतीचे सर्व जिव्हाळ्याचे चेहरे एका स्फोटाने हिरावून घेतले.