अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चांगलेच चर्चेत आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध संपावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धानेही जगाला धडकी भरलेली आहे. हमासला समूळ नष्ट करण्यासाठी इस्रायल हमासच्या तलांवर हल्ले करत आहे. हमासला संपवण्यासाठी इस्रायलने लेबनॉन, इराणविरोधात शत्रुत्त्व पत्करलं आहे. आता एवढेच नाही तर इस्रायले हमासवरील कारवाई म्हणून थेट कतारच्या राजधानीवरदेखील हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे आता परिस्थिती चांगलीच चिघळली असून कतारसह मुस्लीम राष्ट्रे आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे आता डोनाल्ड ट्रम्प हेदेखील इस्रायलवर चांगलेच भडकले आहेत. त्यांनी इस्रायलचे सर्वेसर्वा बेंजामिन नेतान्याहू यांना सुनावले असल्याचे म्हटले जात आहे.
नेमकं काय घडलं? ट्रम्प का चिडले?
मंगळवारी (9 सप्टेंबर) इस्रायलने कतारची राजधानी दोहा या शहरावर हल्ले केले. हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले केल्याचे इस्रायलकडून सांगितले जात आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात मध्यस्थी घडवून आणण्यासाठी याच कतारमध्ये आतापर्यंत बैठकी झाल्या आहेत. मात्र ज्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी बैठका व्हायच्या त्याच देशावर इस्रायलने हल्ला केल्यामुळे सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याची दखल डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील घेतली असून या हल्ल्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना नेमके काय सांगितले?
डोलान्ड ट्रम्प यांच्या नाराजीबाबतचे वृत्त Axios या वृत्तसंकेतस्थळावर देण्यात आलेले आहे. या रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी थेट बेंजामीन नेतान्याहू यांना कॉल करून आपली ही नाराजी कळवली आहे. तसेच अशा चुका पुन्हा व्हायला नको. अशा प्रकारचे हल्ले स्वीकारले जाऊ शकत नाहीत, असे ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना सांगितले. Axios च्या रिपोर्टनुसार इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे ट्रम्प यांचे सहकारीदेखील चकित झालेले आहेत.
दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यानंतर भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारच्या अमीर यांना कॉल करून आम्ही या हल्ल्याची निंदा करतो, असे सांगितले आहे. तसेच कोणताही वाद शांतता आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची आमची भूमिका आहे, असेही मोदी यांनी कळवले आहे.