इचलकरंजी शहरातील मालमत्ताधारकांकडून वारंवार थकित घरफाळ्यावरील व्याज माफ करण्याची मागणी होती याची दखल घेत महानगरपालिकेने अभय योजना राबवावी व सदर रकमेवरील व्याज तात्काळ माफ कराये अशा मागणीचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरवाळे यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी शहराची लोकसंख्या अंदाजे चार लाख असून ६२ हजार मालमत्ताधारक आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग व्यवसाय आहे कोरोनाच्या काळात व पूर परिस्थितीत छोटे मोठे उद्योग व्यवसाय बंद राहिले त्यामुळे नागरिकांना व मालमत्ताधारकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले बँकेचे कर्ज व आर्थिक अडचणीमुळे बऱ्याच मालमत्ताधारकाने कर भरला नाही. त्यामुळे थकबाकी वाढत गेली. अंदाजे २७ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. महापालिकेकडून वसुलीसाठी विशेष पथकाची नेमणूक केली जाते. त्यांच्यावर लाखो रुपये खर्च होतात. वसुली पथकाबरोबर मालमत्ताधारकांचे वादावादीचे प्रसंग निर्माण होतात. महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार थकित घरफाळ्यावरील व्याज माफ करण्याचे अधिकार महानगरपालिकेला आहेत. तरी आयुक्तांनी या निवेदनाची दखल घेत व्याज माफ कराये व त्यासाठी अभय योजना राबवावी.
वेळेत घरफाळा भरणाऱ्या मालमत्ताधारकांना संयुक्त करामध्ये सवलत देण्याचा अधिकार जसा महापालिकेला आहे, तसाच थकीत घरफाळ्यावरील व्याज माफ करण्याचा अधिकारही महापालिकाला असल्याने आपण याची दखल घेऊन व्याजमाफीच्या बोजातून मालमत्ताधारकांची मुक्तता करावी, असे प्रकाश मोरबाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.