कोथळी (ता.शिरोळ) येथे जालना जिल्ह्यातून ऊसतोडीच्या निमित्ताने आलेल्या आणि सध्या कोथळी हद्दीत शेत पालावर वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील अठरा वर्षांच्या युवतीचे मंगळवारी (दि.१०) दुपारी सुमारे एकच्या सुमारास अपहरण झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
युवतीला गाडीतून पळवून नेण्यात आल्याचे सांगण्यात येत असून संबंधित वाहन दानोळीच्या दिशेने गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
या घटनेची माहिती कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. अपहरणाच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पोलिसांची तपास चक्रे गतिमान झाली आहेत.
हा प्रकार हा अपहरणाचा आहे की अन्य कोणता प्रकार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. लवकरच घटनेचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे कोथळीसह परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.





