Tuesday, February 10, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजीच्या महापौरपदी भाजपचे उदय धातुंडे बिनविरोध

इचलकरंजीच्या महापौरपदी भाजपचे उदय धातुंडे बिनविरोध

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपचे उदय आनंद धातुंडे तर उपमहापौरपदी अ‍ॅड.अनिल देवकरण डाळ्या यांची सोमवारी बिनविरोध झाली. विरोधी पक्ष असलेल्या शिव शाहू आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवड बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केल्यामुळे पहिलेच महापौर, उपमहापौर बिनविरोध निवडून आले.

 

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा महायुतीने 47 जागा जिंकत सत्ता मिळवली होती. त्यामुळे भाजपकडे निर्विवाद बहुमत असल्याने महापौर, उपमहापौर ही दोन्ही पदे याच पक्षाकडे येणार हे स्पष्ट झाले होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या वतीने भाजपकडून उदय धातुंडे व उपमहापौर पदासाठी अनिल डाळ्या यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी शिवशाहू विकास आघाडीकडून महापौर पदासाठी सयाजी चव्हाण व उपमहापौर पदासाठी संगीता आलासे यांनी अर्ज भरले होते. महापौर आणि उपमहापौरच्या नावावरून भाजपा नगरसेवकात नाराजी नाट्य होते. त्यामुळे पहिल्या निवडीवेळी काही “टि्वस्ट” निर्माण होणार का अशी चर्चा होती.

 

निवडीपूर्वी कोणत्याही राजकीय घडामोडी घडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भाजप चे सर्व नगरसेवक सहलीवर पाठवण्यात आले होते. ते नगरसेवक सोमवारी सकाळी शहरात दाखल झाले. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी चौकापासून सर्व सदस्य सभागृहात आले.

 

अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सभेचे कामकाज सुरू झाले. सभेच्या सुरवातीलाच विरोधी गटाचे सयाजी चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सात दिवसाचा कालावधी अपेक्षित असताना तो दोन दिवसाच्या दिल्याचा आक्षेप घेत हरकत दाखल करत महापौर निवडीला स्थगिती देण्याची मागणी केली. याबाबतचे वैधानिक स्पष्टीकरण पिठासीन अधिकारी शिंदे यांनी करत आक्षेप फेटाळून लावला. त्यानंतर महापौर निवडीला सुरुवात झाली.

 

यावेळी सयाजी चव्हाण यांनी आपला महापौरपदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पिठासीन अधिकारी शिंदे यांनी यांनी उदय धातुंडे यांची महापौरपदी निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीवेळी संगीता आलासे यांनीही माघार घेतली. त्यामुळे डाळ्या यांचीही बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर संजय शिंदे, पल्लवी पाटील यांनी नूतन महापौर धातुंडे व उपमहापौर डाळ्या यांचा सत्कार केला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -