नातवंडं म्हणजे दुधावरची साय असतात.. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतात, पण आपल्या नातवंडांवर तरी त्यांचं सगळ्यात जास्त प्रेम असतं. त्यांचे लाड करण, खेळवणे, नव्या गोष्टी शिकवणं, संस्कार करणं या सगळ्या गोष्टी आजी-आजोबा आवडीने करत असतात. नातवंडांमध्ये त्यांचा जीव गुंतलेला असतो. पण अक्कलकोटमध्ये आजी- नातवासंदर्भातील एक एवढी हृदयद्रावक घटना घडली की ती ऐकून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
काळाने घातला घाला, एकाच दिवशी कुटुंबातील दोघांचा मृत्यू
अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावातील व्हनमाने कुटुंबावार काळाने घाला घातला. त्यांच्या घरात एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाला. आधी नातू आणि त्यापाठोपाठ आज्जी गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. एकाच दिवशी एकुलता एक नातू अपघातात मृत्यू पावला त्यामुळे त्याच्या अंत्यसंस्कारावेळी आजी जनाबाई व्हानमाने यांनीही जीव सोडला. त्यामुळे कुटिबियांच्या शोकाला पारावार उरला नाही. या घनटेमुळे गावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
9वीत शिकणाऱ्या नातवाचा झाला मृत्यू
अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावाजवळ आदित्य व्हनमाने या मुलाचा कारने जोरदार धडक दिल्यामुळे अपघाती मृत्यू झाला होता. आदित्य हा चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात इयत्ता नववी शिकत होता. शाळा सुटल्यानंतर आदत्यने खाजगी दुचाकीस्वाराला हात दाखवत, आपल्याला गाडीवरून गावाकडे सोडण्याविषयी विनंती केली. दुचाकीस्वाराने त्याचं ऐकल्यावर आदित्य हा बाईकवर बसला, घराच्या दिशेने ते जात असतानाच एक कारचालकाने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडी चालवणारा, पुढे बसलेला चालक गंभीर जखमी झाला. तर मागे बसलेला आदित्य दुर्दैवी ठरला, त्याचा या अपघातात मृत्यू झाला.
नातवाचा मृतदेह पाहून आजीला बसला धक्का, स्मशानातच सोडला प्राण
आदित्यच्या मृत्यूची बातमी ऐकताच कुटुंबीयाना धक्का बसला, घरात आक्रोश झाला. अखेर कसेबसे समजावून अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. मात्र तिथे आणखीनच आक्रित घडलं. आदित्यच्या आजीने स्मशानात त्याचा मृतदेह पाहिला, पण ते पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्या वयोवृद्ध माऊलीला स्मशानात, जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि दुर्दैवाने नातवापाठोपाठ आजीचाही मृत्यू झाला. हे पाहून तर कुटुंबियांच्या आक्रोशाला, दु:खाला पारावार उरला नाही.
शोकाकुल वातावरणात, दु:खी अंत:करणाने व्हनमाने कुटुंबियांनी आजी व नातवावर एकाच स्मशानात अंत्यसंस्कार करत त्यांना अखेरचा निरोप दिला. आजी-नातवाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याच्या या दुर्दैवी घटनेमुळे हन्नूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे