हे मीटर अत्याधुनिक असून, त्यात कम्युनिकेशन पोर्ट बसविण्यात आलेले आहे. त्यामुळे मीटरचा रिअल टाईम डाटा थेट महावितरणच्या सव्र्व्हरवर पोहोचतो. मीटर नादुरुस्त झाल्यास किंवा कुणी फेरफार केल्यास त्याची माहिती थेट कंपनीला मिळते.अशा संशयास्पद प्रकरणांची प्रत्यक्ष तपासणी करताना वीज चोरी उघडकीस येत आहे. याच पद्धतीने गंगापूर तालुक्यातील रेहाना कॉलनीत महावितरण ग्रामीण-२ विभागाच्या विशेष पथकाने तपासणी केली. सहायक अभियंता धनंजय बाणेदार यांच्या नेतृत्वाखालील टीमने अचानक छापा टाकला असता काही ग्राहकांनी नव्याने बसवलेल्या स्मार्ट टीओडी मीटरमध्ये फेरफार करून वीज वापरत असल्याचे समोर आले.
तपासात मच्छिद्र गोरखनाथ राऊत याने ११ हजार ५७० रुपयांची, इंदिराबाई शिवराम तौर हिने ८ हजार ९९० रुपयांची तर बागवान तौसिफ शेख हानिफ याने तब्बल १३ हजार २५० रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले. या चौघांनी मीटरमध्ये छेडछाड करून महावितरणची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आहे.
वीज चोरीमुळे महावितरणला आर्थिक फटका बसत असून प्रामाणिक ग्राहकांवर अतिरिक्त भार येतो. त्यामुळे कंपनीने अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही छत्रपती संभाजीनगर शहर व वैजापूर येथे अशाच प्रकारे स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गंगापूर शहर शाखेच्या सहायक अभियंता भूमिका बनसोडे यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अशा प्रकारे वीज चोरी करणाऱ्यांना यापुढेही कोणतीही गय दिली जाणार नाही, असा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.