जालना शहरातील वडारवाडी येथे एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे. येथे असलेल्या खदानामध्ये आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालना शहरातील संभाजीनगर बस स्टँड परिसरातील चार अल्पवयीन मित्र हे फोटो काढण्यासाठी गेले होते.
यावेळी तिथे असलेल्या पाण्यात आनंद घेण्यासाठी ते खाली उतरले. मात्र, हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. चारही मित्र खदानीतल्या पाण्यात उतरून फोटो काढू लागले. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यातील दोन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ संजय हरबळे (वय 16) आणि जस्मित रेहाल (वय 18) अशी मृत मुलांची नावं आहेत.
चार मित्रांपैकी त्यातील दोन जणांना पोहता येत होतं. तर दोघांना पोहता येत नसल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर बाब ही आसपासच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सदर माहिती पोलिसांना दिली. पोलिस व नागरिकांनी दोन्ही मुलांचे मृतदेह वर काढले. घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी मदन गायकवाड इतर कर्मचाऱ्यांनी येऊन सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
चाकूने वार करत जावयाने मामसासऱ्याला संपवलं
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून जावयाने चक्क आपल्या मामसासऱ्याची हत्या केलीय. काल पुन्हा भुसावळ शहर पुन्हा एका हत्येनं हादरलं आहे. भुसावळ शहर नेहमीच गुन्हेगारीमुळे चर्चेत राहत असतं. अनेकवेळा या ठिकाणी दिवसाढवळ्या खून झालेले आहेत. काल अशीच एक घटना भुसावळ शहरात घडली, त्यात मामसासऱ्यावर चाकूने वार करून ठार (Bhusawal Murder) करण्यात आलं आहे.
कौटूंबिक वादातून नात्याने मामसासरा असलेल्या 40 वर्षीय व्यक्तीची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. तर वादादरम्यान झालेल्या तुंबळ हाणामारीत व चाकू हल्ल्यात संशयीत जावयासह सासरा देखील जखमी झाला. ही धक्कादायक घटना खडका रोडवरील अयान कॉलनीत काल शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. हत्येच्या घटनेनं शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शेख समद शेख ईस्माइल (वय 40, रा. कंडारी) असं मयताचं नाव आहे.