विमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सव्वादोन कोटी लाभार्थींपैकी २६ लाख ३४ हजार महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी पार पडली. त्यात २१ वर्षांपेक्षा कमी आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी महिला आहेत.
पडताळणीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. ज्या सूना किंवा मुलीचे रेशनकार्ड विभक्त आहे, त्यांचा बंद केलेला लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला पात्र होत्या. तसेच एका कुटुंबातील एक विवाहित, एक अविवाहित अशा दोनच महिला पात्र ठरत होत्या. तरीदेखील, निकष डावलून लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि लाभही मिळविला. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीवरून असे लाभार्थी बाजूला काढून त्यांची पडताळणी करण्यात आली. पण, सोलापूर जिल्ह्यातील साडेदहा हजार तर राज्यभरातील चार लाखांहून अधिक महिला त्यांनी अर्ज भरताना दिलेल्या पत्त्यावर सापडल्याच नाहीत. दुसरीकडे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले असले, तरी अनेक मुलींचा विवाह झाल्याने त्यांचे रेशनकार्ड विभक्त आहे. त्यामुळे अशा सूना- मुलींचा लाभ बंद होणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अहवाल सादर, शासनस्तरावरून होईल निर्णय
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सोलापूर जिल्ह्यातील एक लाख चार हजार लाभार्थी महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली. त्यात सुमारे दहा हजार महिला त्यांच्या राहत्या पत्त्यावर सापडल्या नाहीत. पडताळणीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. शासन स्तरावरून त्यांच्यासंदर्भातात निर्णय होईल.
– रमेश काटकर, महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर
‘आधार’ नंबर चुकला; लाभ दुसऱ्याच्या खात्यात
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरताना महिलांकडून आधारकार्डवरील क्रमांक चुकीचा टाकला गेला आहे. शासन स्तरावरून त्या महिलांना लाभ वितरीत होतोय, पण आम्हाला आतापर्यंत लाभ मिळालाच नाही, अशा तक्रारी अनेक महिलांनी ‘लाडकी बहीण’च्या पोर्टलवर केल्या आहेत. त्यातील १५ तक्रारींची पडताळणी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांनी केली, त्यावेळी आधार क्रमांक चुकल्याने आतापर्यंत दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात लाभ जमा झाल्याची बाब समोर आली आहे. आता त्या दुसऱ्या लाभार्थींकडून लाभाची रक्कम कशी वसूल करायची हा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर आहे.
‘लाडकी बहिण’च्या पडताळणीची स्थिती
अपेक्षित पडताळणी
२६.३४ लाख
कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी
१९.३७ लाख
पत्त्यावर न सापडलेल्या महिला
४.२३ लाख
पडताळणी झालेल्या महिला
२२.११ लाख