डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे सध्या भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध तणावाचे आहेत. अमेरिकेने भारतावरील हा टॅरिफ कमी करावा, यासाठी प्रयत्ने केले जात आहेत.
मात्र ट्रम्प यांनी अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प ज्या देशाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच देशाने भारताविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जागतिक पातळीवर भारतासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
नेमका काय निर्णय घेण्यात आला?
मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनने भारताकडून निर्णयात केल्या जाणाऱ्या डिझेलबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची येत्या 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी केली जाईल. या निर्णयानुसार भारतातून येणाऱ्या प्रत्येक डिझेलची चाचणी केली जाईल. भारताकडून युक्रेनला दिल्या जाणाऱ्या तेलात भारताला रशियाकडून दिल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचा समावेश तर नाही ना? याची युक्रेनकडून तपासणी केली जाणार आहे. युक्रेनची प्रमुख एनर्जी कन्सल्टन्सी ‘एनकॉर’ने (Enkorr) दिलेल्या माहितीनुसार भारत आणि रशिया यांच्यात तेलव्यापार होत असल्यामुळे युक्रेनने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. देशातील सुरक्षा संस्थांनी दिलेल्या निर्देशांनुसार युक्रेनच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत भारतातून येणाऱ्या डिझेलच्या प्रत्येक लॉटवरी तपासणी केली जाणार आहे.
भारत रशियाकडून तेल का खरेदी करतो?
भारत आणि रशिया या दोन्ही देशांत चांगले संबंध आहेत. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो. रशियाचे युराल ग्रेडचे कच्चे तेल आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड ऑीलच्या तुलनेत 5 ते 6 डॉलर प्रति बॅरलने स्वस्त मिळते. रशियाकडून विकल्या जाणाऱ्या या तेलाचा भारतातील रिफायनरींना फायदा होतो. त्यामुळेच भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो आणि त्यावर प्रक्रिया करून ते इतर देशांना विकले जाते. भारत रशियासोबत तेलव्यापार करतो म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादलेला आहे. असे असतानाच आता युक्रेननेही भारताविरोधात हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारत यावर काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.