सध्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी यांसह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील जालना, सोलापूर, पुणे आणि वर्धा जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या नदी आणि नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढणीला आलेली पिके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
सध्या मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतही जोरदार पाऊस कोसळत आहे. सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहराच्या अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. ज्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच रेल्वे सेवाही विलंबाने धावत आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासोबतच रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे. यामुळे नदी किनारी राहत असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जालन्यात ढगफुटीसदृश्य पाऊस
जालना शहरात मध्यरात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. ज्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. शहरातील चौधरी नगर परिसरातील जालना-मंठा महामार्गावर पाणी साचल्यामुळे एका बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही चारचाकी गाड्यादेखील पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. यामुळे घोटण, काजळा आणि सायगाव या गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. तसेच, मात्रेवाडी, शेलगाव आणि पाडळी या गावांमध्येही शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच सोयाबीन आणि कापूस ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सोलापुरात सीना नदीला पूर
सोलापूर जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. करमाळा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे सीना नदीवरील संगोबा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. तसेच बार्शी तालुक्यातील जवळगाव धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. ज्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अक्कलकोट तालुक्यातही अतिवृष्टीमुळे खैराट गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नागरिकांनी तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
पुण्यात लेप्टोचा धोका वाढला
पुण्यात परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. हा आजार दूषित पाण्याच्या संपर्कातून पसरतो. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत पुण्यात या आजाराचे १२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पावसामुळे पुणे विमानतळावरील पाच उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ज्यात पुणे-बडोदा, पुणे-जोलापूर, पुणे-दिल्ली, पुणे-नागपूर आणि पुणे-चेन्नई या मार्गांचा समावेश आहे.
पुणे शहरात झालेल्या जोरदार पावसानंतर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करून १६०० क्यूसेक्स करण्यात आला आहे. विश्रांतवाडीमध्ये सर्वाधिक ९८ मिमी, हडपसरमध्ये ९५ मिमी आणि नगर रस्त्यावर ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
वर्ध्यात एक व्यक्ती वाहून गेला
वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील आनंदवाडी शिवारात नाल्याच्या पाण्यात एक ६० वर्षीय व्यक्ती वाहून गेला. ते आणि त्यांची पत्नी पूल ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही वाहून जाऊ लागले. पत्नीला झाडाची फांदी मिळाल्याने ती वाचली, मात्र पतीचा शोध अद्याप सुरू आहे.
बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, बुलढाणा, देऊळगाव राजा या तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, उडीद, मूग आणि कापूस या पिकांना पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.