आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला.
या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं. तसेच टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने नाणेफेकीवेळी देखील पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हस्तांदोलन केलं नाही. यामुळे पाकिस्तानला चांगलीच मिरची झोंबली. त्यानंतर आता सूर्यकुमार यादवने आणखी एक मागणी आशियाई क्रिकेट परिषदेकडे ठेवली आहे.
सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचं अध्यक्षपद पाकिस्तानचे मोहसीन नकवीकडे आहे. जर कोणत्याही संघाने आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकल्यास मोहसीन नकवीकडून ट्रॉफी दिली जाईल. हे सगळं पाहता सूर्यकुमार यादवने आम्ही मोहसीन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही, असं सांगितलं आहे. भारताने आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकल्यास मोहसीन नकवी यांच्याकडून आम्ही ट्रॉफी स्वीकारणार नाही, असं मत सूर्यकुमार यादवने आशियाई क्रिकेट परिषदकडे व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता आशियाई क्रिकेट परिषद कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पाकिस्तानने आशियाई क्रिकेट परिषदेकडे नोंदवला निषेध
आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याबद्दल पाकिस्तानने आशियाई क्रिकेट परिषदेकडे निषेध नोंदवला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एका निवेदनात म्हटले आहे की, नाणेफेकीच्या वेळी कर्णधार सलमानला मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत हस्तांदोलन न करण्यास सांगितले होते. तसेच सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास टाळले. याबाबत पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने निषेध नोंदवत हे वर्तन क्रीडा भावनेविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.
भारत सुपर 4 मध्ये दाखल
आशिया चषकातील अ गटात भारतानं दोन्ही मॅचमध्ये विजय मिळवला आहे. यूएई आणि पाकिस्तानवर भारतानं विजय मिळवत 4 गुण मिळवले. पाकिस्ताननं ओमानवर विजय मिळवला. तर, यूएईनं देखील ओमानवर विजय मिळवला. यामुळं भारत सुपर 4 मध्ये दाखल झाला आहे. आता अ गटातून पाकिस्तान किंवा यूएई पैकी एक संघ सुपर 4 मध्ये जाईल.
आशिया कपमधील उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना