Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रशिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका 'ऑनलाईन सेट', डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

वर्षभरात होणाऱ्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उन्हाळी, हिवाळी सत्रांतील परीक्षांच्या ७० टक्के प्रश्नपत्रिका ऑनलाईन पद्धतीने सेट (तयार) करण्याची यशस्वी कामगिरी शिवाजी विद्यापीठाने केली आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केल्याने वेळ, खर्चात बचत झाली असून, प्रक्रियेची गती वाढली आहे.

 

या परीक्षा मंडळाकडून दैनंदिन कामकाजामध्ये ‘आयसीटी’चा वापर वाढविला जात आहे. त्यात एसआरपीडी प्रणालीद्वारे प्रश्नपत्रिकांचे वितरण, उत्तरपत्रिकांची ऑनस्क्रीन तपासणी सुरू केली. प्रश्नपत्रिका सेट करण्याची प्रक्रिया अचूक आणि वेगवान होण्यासाठी या परीक्षा मंडळाने ऑनलाईन पेपर सेटची कार्यवाही सुरू केली. त्यात हिवाळी सत्र (ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४) मध्ये दोन हजार ९७ प्रश्नपत्रिका ऑनलाईन पद्धतीने सेट केल्या. त्याची संख्या उन्हाळी सत्रात (मार्च-एप्रिल २०२५) मध्ये दोन हजार ८५७ पर्यंत पोहोचली आहे.

 

वर्षभरात विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी विद्यापीठाला पाच हजार प्रश्नपत्रिका लागतात. त्यापैकी ७० टक्के प्रश्नपत्रिका ऑनलाईन सेट करण्याची कामगिरी परीक्षा मंडळाने केली आहे. यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या खर्चात ७० टक्के, तर वेळेमध्ये ५० टक्क्यांची बचत झाली आहे. विद्यार्थ्यांपर्यंत अचूक प्रश्नपत्रिका पोहोचविणे विद्यापीठाला शक्य झाले आहे.

 

एसआरपीडी प्रणालीद्वारे परीक्षा मंडळाकडून विद्यापीठ कॅम्पसमधील अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका वितरण करतो. त्यासाठीच्या संगणक प्रणालीत परीक्षा मंडळ आणि संगणक केंद्राने ऑनलाईन प्रश्नपत्रिका सेट करण्याचे मॉड्युल विकसित केले. त्याद्वारे प्राध्यापकांना त्यांच्या घरी बसून अथवा महाविद्यालयांतून प्रश्नपत्रिका सेट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्राध्यापकांनी सेट केलेल्या प्रश्नपत्रिकेची संबंधित विषयाच्या अध्यक्षाकडून पडताळणी करून ती अंतिम केली जाते. प्रश्नपत्रिका अंतिम झाल्यानंतर ती थेट एसआरपीडीद्वारे परीक्षा केंद्रांवर पाठविली जाते. तेथून ती डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना दिली जाते.

 

‘प्रश्नपत्रिका ऑनलाईन सेट केल्याने पूर्वीच्या तुलनेत होणारा खर्च आणि वेळेत अधिक प्रमाणात बचत झाली आहे. प्रश्नपत्रिकांमधील अचूकता वाढली आहे. लवकरच शंभर टक्के प्रश्नपत्रिका ऑनलाईन सेट केल्या जातील. अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, तज्ज्ञ आदींच्या माध्यमातून क्वेश्‍‍च बँक तयार करून ऑटोमेटिक पेपर सेटची प्रणाली विकसित केली जाणार आहे.

 

-डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

 

ऑन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीद्वारे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू केली. प्रारंभी चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एक लाख ४० हजार उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. त्यानंतर उन्हाळी सत्रात एकूण १८ अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासणीची संख्या दोन लाख १८ हजारांवर पोहोचली आहे. आता यंदाच्या हिवाळी सत्रात २८ अभ्यासक्रमांसाठी ‘ओएसएम’चा वापर करण्याबरोबर उत्तरपत्रिकांची संख्या चार लाखांवर पोहोचविण्याचे नियोजन परीक्षा मंडळाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -