देव तारी त्याला कोण मारी” असं म्हणतात, पण उत्तर प्रदेशात (UP Crime News) घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या चर्चेत आली आहे. शहाजहानपूर जिल्ह्यातील एका गावात मेंढ्या चरायला गेलेल्या मेंढपाळाला मातीतून बालकाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने पाहिल्यावर त्याला मातीतून बाहेर आलेला एका बाळाचा लहानसा हात दिसला. क्षणाचाही विलंब न करता त्याने गावकऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिखलाखाली गाडलेलं बालक बाहेर काढलं.
शरीर घाणीने माखलेलं, श्वसनाचा त्रास, ऑक्सिजनची पातळी घटलेली
ते बाळ म्हणजे अवघ्या 20 दिवसांची मुलगी होती. तिच्यावर तातडीने सरकारी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले की, “बाळ अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाले होते. तिच्या तोंडात आणि नाकात चिखल भरलेला होता, शरीर घाणीने माखलेलं होतं. श्वसनाचा त्रास, ऑक्सिजनची पातळी घटलेली आणि किड्यांनी व प्राण्यांनी घेतलेल्या चाव्यांच्या खुणा दिसत होत्या.”
तिच्या जखमा अजून ताज्या होत्या
डॉ. कुमार यांनी पुढे सांगितले की, “हे बाळ पुरल्यानंतर लगेचच सापडलं असावं. तिच्या जखमा अजून ताज्या होत्या. सध्या प्लास्टिक सर्जनसह तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा तिच्यावर उपचार करत आहे. संसर्गावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” पोलिसांनी या चिमुकलीचे पालक शोधण्यास सुरुवात केली असून, चाइल्ड हेल्पलाइनलाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. अशी घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही. 2019 मध्ये याच शहाजहानपूरमध्ये एका बालिकेला माठात ठेवून जिवंत पुरण्याचा प्रकार समोर आला होता. त्या वेळीही तिला उपचारांनंतर वाचवण्यात आले होते.