देशात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. जनतेचा कौल महायुतीला असल्याने महापालिकेसह सर्व निवडणुका महायुतीतर्फे लढविणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, महापालिकेच्या मागील सभागृहात भाजप ताराराणी आघाडीचे 34, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक होते. भाजपच्या 34 जागा कायम ठेवून आणखी 15 जागांसाठी आग्रह केला जाणार आहे. जागा वाटपावरून महायुतीत वाद होणार नाही.
जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार, एक खासदार आहे. सर्व सत्ता स्थाने महायुतीकडे आहेत. महापौर आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच असेल, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात महायुती एकोप्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाईल, असे सांगून खा. महाडिक म्हणाले, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आणि हद्दवाढीचा संबंध नाही. थेट पाईपलाईन योजनेत काही उणिवा आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत. ज्यांनी योजना राबवली त्यांनीच हे काम करावे. भाजप किंवा महायुती ते पाप घेणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. पत्रकार परिषदेस आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर उपस्थित होते.
महादेवराव महाडिक यांची सत्ता असताना असे प्रकार नव्हते
गोकुळचे ठराव करण्यावरून राडा होत असल्याकडे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, गोकुळमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता असताना असे प्रकार होत नव्हते. सत्ता बदलानंतर हे प्रकार होत आहेत. गोकुळची निवडणूकसुद्धा महायुती म्हणूनच लढवणार आहे. मात्र, सहकारातील निवडणूक असल्याने त्या त्यावेळी निर्णय घेऊ.




