वादळ हे असं नैसर्गिक संकट आहे जे एकदा आलं की सगळं काही उद्ध्वस्त होतं. लोकांची घरं, गाड्या सगळं काही नेस्तनाबूत होऊन जातं. अशा वेळी निसर्गाच्या रौद्ररुपापुढे मानवी यंत्रणादेखील कुचकामी ठरते. दरम्यान, आता अशाच प्रकारचं एक भयानक वादळ चीनच्या दिशेने येत आहे. यामुळे चीनच्या लोकांनी आतापासूनच खबरदारी घ्यायला चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वादळाला तोंड देण्यासाठी चीनमध्ये तयारी चालू करण्यात आली आहे. लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त
मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या दिशेने येणाऱ्या या वादळाचे नाव रगासा असे आहे. या वादळाची चीनमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. रगासा गेल्या काही वर्षांतलं सर्वात मोठं वादळ असल्याचे बोलले जात आहे. याच वादळाने फिलिपिन्समध्ये 3 लोकांचा जीव घेतला आहे. याच वादळामुळे फिलिपिन्समध्ये हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळेच चीनमध्ये या वादळाचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच विमानोड्डाणही रद्द करण्यात आले आहेत. लोक या वादळापासून स्वत:ला कसे सुरक्षित ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करत आहेत.
रगासा वादळाचा धोका किती?
हाँगकाँगच्या हवामान विभागानुसार रगासा हे वादळ तब्बल 230 किमी प्रतितास या वेगाने चीनच्या दिशेने येत आहे. सध्या हे वादळ 22 किलोमीटर प्रतितास या वेगाने दक्षिण चीन सागराच्या उत्तर दिशेने जात आहे. हे वादळ बुधवारी चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील शेन्जेन आणि श्वेन काऊंटी या सागरी किनाऱ्यावर धडकू शकते. चीनच्या हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार या वादळामुळे ग्वांगडोंग समुद्र किनारी भागात मोठा विध्वंस होऊ शकतो.
समुद्राची पाणीपातळी 5 मीटरपर्यंत वाढणार?
दरम्यान, या वादळामुळे हाँगकाँगमध्ये समुद्राच्या पाण्याची पातळी 2 मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. काही भागात ही पाणीपातळी 4 ते 5 मीटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. चीनमध्ये 2017 साली हाटो नावाचे तर 2018 साली मंगखुट नावाचे वादळ आले होते. या वादळामुळे चीनचे अनुक्रमे 154 दशलक्ष आणि 590 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे नुकसान झाले होते. त्यामुळे आताच्या नव्या वादळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.




