डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफनंतर अजून एक धक्कादायक असा निर्णय घेतला. गुरुवारी रात्री उशिरा फार्मासह अनेक क्षेत्रांवरील उत्पादनावर त्यांनी मोठा टॅरिफ लावला. भारतीय औषध उत्पादन कंपन्यांसाठी अमेरिका ही एक मोठी बाजारपेठ राहिलेली आहे. मात्र, आता अमेरिकेने तब्बल 100 टक्के टॅरिफ लावल्याने थेट धक्का बसला. भारतीय शेअर बाजारावर याचा थेट परिणाम पडल्याचे बघायला मिळतंय. सेन्सेक्स 412.67 अंकांनी घसरून 80, 747.01 वर पोहोचला. निफ्टी 115 अंकांनी घसरून 24,776 वर व्यवहार करत आहे. अमेरिकेतील बाजारपेठेत मोठी गुंतवणूक असलेला फार्मा स्टॉक्स आज कोसळला आहे. हा मोठा पहिला झटका डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर म्हणावा लागेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावला. त्याचा परिणाम शेअर बाजारात ऑरोबिंदो, लुपिन, डीआरएल, सन आणि बायोकॉन या कंपन्यांवर बघायला मिळाला. आज अरविंदो फार्माचा शेअर 1.92 टक्क्यांनी घसरून 1,076 रुपयांवर व्यवहार करत आहे. हा मोठा धक्का कंपनीला बसला आहे. अरविंदो फार्माचा मोठा बाजार अमेरिकेत बघायला मिळतो. डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयानंतर कंपनीचा शेअर पडला.
ल्युपिनचे शेअर्स जवळपास ३ टक्क्यांनी घसरले. सन फार्माचे शेअर्स 1580 वर व्यवहार करत आहेत, 3.8 टक्क्यांनी घसरले आहेत. सिप्लाचे शेअर्स दोन टक्क्यांनी घसरले आहेत. अमेरिकेने घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयानंतर फार्मा कंपन्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण अनेक भारतीय कंपन्या या अमेरिकेत मोठी उलाढाल करतात. त्यामध्येच आता तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्यात आल्याने संकट उभे आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरूवातीला भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या सर्व वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयटी कंपन्यांना धक्का देत H-1B व्हिसावर 88 लाख रूपये शुल्क आकारले. भारताच्या नियंत्रणात असणारे मोठे बंदरही काढून घेतले आणि आता थेट औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर भारतीय कंपन्यांना मोठे नुकसान होणार हे सध्यातरी दिसत आहे. त्याचा परिणाम आजच शेअर बाजारात बघायला मिळाला.




