टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. उभयसंघात पहिला सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. शुबमन गिल याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर रवींद्र जडेजा उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. ऋषभ पंत याला पायाच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे भारतीय संघात ध्रुव जुरेल याचा विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघांनी सामन्याआधी जोरदार सराव केला आहे.
उभयसंघातील सलामीच्या सामन्याला सकाळी साडे नऊ वाजता सुरुवात होणार आहे. सामन्याला अवघे काही तास बाकी आहेत. पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधील 9 खेळाडूंची नावं जवळपास निश्चित आहेत. मात्र त्यानंतरही प्लेइंग ईलेव्हनचा तिढा कायम आहे. उर्वरित 2 जागांसाठी पेच आहे. या जागी कोणत्या दोघांना संधी द्याची आणि कुणाला नाही? या मोठा पेच टीम मॅनेजमेंटसमोर आहे.
ओपनिंग कोण करणार?
टीम इंडियाची पहिल्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? कोणता खेळाडू कोणत्या स्थानी खेळेल? हे आपण जाणून घेऊयात. इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियासाठी यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या जोडीने ओपनिंग केली. मायदेशात हीच जोडी ओपनिंग करताना दिसू शकते.
तिसऱ्या स्थानी कोण?
इंग्लंड दौऱ्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शन याला पहिल्या सामन्यात संधी मिळाल्यास तो तिसऱ्या स्थानी खेळताना दिसू शकतो. तर कॅप्टन शुबमन गिल चौथ्या स्थानी बॅटिंग करेल, अशी शक्यता आहे. शुबमनने इंग्लंड दौऱ्यात चौथ्या स्थानी बॅटिंग करत 600 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे शुबमनकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
पंतची दुखापत आणि जुरेलला संधी
नियमित विकेटकीपर आणि उपकर्णधार ऋषभ पंत दुखापतीमुळे या मालिकेचा भाग नाही. त्यामुळे विंडीज विरुद्ध ध्रुव जुरेल विकेटकीपर म्हणून खेळताना दिसणार असल्याचं निश्चित आहे. ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्यावर उपकर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. तर वॉशिंग्टन सुंदर याला ऑलराउंडर म्हणून संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांवर वेगवान गोलंदाजाची जबाबदारी असेल. अशाप्रकारे पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमधील 9 खेळाडू निश्चित असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
2 जागांसाठी तिढा कायम
आता उर्वरित 2 जागांसाठी कुणाला संधी मिळणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. आम्ही हवामान आणि परिस्थितीनुसार 1 अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह खेळणार असल्याचं कॅप्टन शुबमन गिल याने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. त्यामुळे आता पेसर म्हणून ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला संधी मिळणार की तिसरा स्पिनर म्हणून अक्षर पटेल याचा समावेश केला जाणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसेच कुलदीप यादव याच्याबाबत काय निर्णय घेतला जातो? हे देखील थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.




