गांधीनगर येथील स्वस्तिक मार्केटमधील अन्सारी गारमेंटवर कॉपीराईट अधिकाऱ्यांनी छापा टाकून नामांकित कंपनीचे लेबल लावलेले ६१० बनावट शर्ट व साहित्य, एकूण १४.३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
मालकावर गुन्हा दाखल – गारमेंट मालक महंमद मिकाईन अन्सारी (रा. कोयना कॉलनी, गांधीनगर) याच्यावर कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला असून तक्रार कंपनीचे अधिकारी नीरजकुमार धहीया (रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) यांनी केली.
व्यापाऱ्यांमध्ये खळबळ – कारवाईदरम्यान गांधीनगरमधील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून पोबारा केला, तर कारवाई रात्री उशिरापर्यंत पोलिस व कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होती.
Fake Branded Shirts Sold Kolhapur : गांधीनगर (ता. करवीर) येथील मुख्य रस्त्यावरील स्वस्तिक मार्केटमधील अन्सारी गारमेंटवर कॉपीराईटच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून नामांकित कंपनीचे लेबल लावलेले सुमारे १४ लाख ३८ हजार ७५० रुपयांचे बनावट शर्ट आणि मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी गारमेंटमालक महंमद मिकाईन अन्सारी (रा. कोयना कॉलनी, गांधीनगर) याच्यावर स्वामित्व हक्क कॉपीराईट अॅक्टनुसार गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद संबंधित कंपनीचे अधिकारी नीरजकुमार नरेंद्रसिंग धहीया (रा . गाझियाबाद उत्तर प्रदेश) यांनी दिली.
गांधीनगर मुख्य रस्त्यावर स्वस्तिक मार्केट येथील दुसऱ्या मजल्यावर अन्सारी यांचे गारमेंट आहे. त्या गारमेंटमध्ये नामांकित कंपनीचे लेबल साध्या गुणवत्तेच्या शर्टवर लावून ती चढ्यादराने विक्री केली जात होती. ही माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी पोलिसांच्या मदतीने गारमेंटवर छापा टाकून कंपनीचे बनावट लेबल लावलेले ६१० शर्ट आणि इतर लेबल व साहित्य असा सुमारे १४ लाख ३८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईमुळे गांधीनगरातील काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाची शटर बंद करून पोबारा केला. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमध्ये कंपनीचे योगेश मोरे, मंगेश देशमुख, नितीन कदम, अविनाश पाटील अन्य अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.




