राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्याने उमेदवारांना ‘टीईटी’साठी अर्ज करता आलेले नाहीत. त्यामुळे अर्जाची मुदत ३ ऑक्टोबरऐवजी आता ९ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शुक्रवारी (ता. ३) मुदतवाढीचा आदेश काढला आहे.
पूर व अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने तेथील वीजपुरवठा, इंटरनेट सुविधेला अडथळा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर टीईटीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना नेट बॅंकिंग, डेबिट व क्रेडिट कार्डवरून पेमेंट करता आले नाही. दुसरीकडे, अनेकांना टीईटीसाठी अर्जही करता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अर्जासाठी व अर्जाचे शुल्क भरायला मुदतवाढ दिली आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नसून, परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार आहे.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ५२ वर्षांपर्यंतच्या शिक्षकांना दिलेल्या दोन वर्षांच्या मुदतीत होणारी २३ नोव्हेंबरची पहिली ‘टीईटी’ असणार आहे. टीईटी उत्तीर्ण नसल्यास यापुढे शिक्षकांना मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख अशा पदांवर पदोन्नती मिळणार नाही, असाही निर्णय आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना (५२ वर्षांपर्यंतचे शिक्षक) टीईटी द्यावीच लागणार असल्याची सद्य:स्थिती आहे.
आणखी लाखभर अर्ज वाढतील
शिक्षक पात्रता परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी नियोजित असून, त्या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. राज्यभरातून आतापर्यंत जवळपास तीन लाख ३६ हजार अर्ज आले आहेत. मुदतवाढीनंतर आणखी एक लाखापर्यंत अर्ज वाढतील. अर्ज करण्यासाठी ९ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
– डॉ. नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारकच
सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या आदेशानुसार, इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावरील सर्व शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्णचे बंधन घालण्यात आले आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांची संधी देण्यात आली असून, त्यानंतर मात्र परीक्षा न देणारे व अनुत्तीर्ण शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पण, राज्य सरकार या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करेल आणि आपल्याला त्यातून दिलासा मिळेल, अशी शिक्षकांना आशा आहे. अजून तरी तसे पाऊल उचलण्यात आले नसल्याने अनेक शिक्षकांनी २३ नोव्हेंबरच्या टीईटीसाठी अर्ज केले असून आणखी अनेकजण करणार आहेत.



