हुपरी येथील एका नामांकित चांदी व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून, त्याच्याकडून लाखो रुपयांची चांदी घेऊन उत्तर प्रदेशमध्ये पसार झालेल्या एका संशयीत कामगाराला हुपरी पोलिसांनी मोबाईलद्वारे तांत्रिक पद्धतीचा वापर करून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ३ लाख रुपये किमतीची ३ किलो ४० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात यश मिळवले.
मेघराज संभाजी शेटके यांची बी.व्ही.एस. ज्वेलर्स नावाची फॅक्टरी आहे. त्यांच्याकडे मागील तीन वर्षांपासून काम करणारा आरोपी अरुणकुमार। राकेशकुमार भारद्वाज (वय २२, उत्तर प्रदेश) याने शेटके यांचा पूर्ण विश्वास संपादन केला होता. आरोपीने कामाच्या अॅडव्हान्सपोटी ५० हजार रुपये घेतले होते.
३० मे २०२५ रोजी शेटके यांनी आरोपीकडे ५ लाख १२ हजार २५० रुपये किमतीची ५ किलो १२५ ग्रॅम चांदी चेन जोडकामासाठी दिली. दोन दिवसांत चेन जोडकाम करून परत आणतो असे सांगून आरोपीने चांदी घेतली आणि त्यानंतर तो सर्व मुद्देमाल घेऊन फरार झाला. शेटके यांनी तत्काळ हुपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा अचूक ठावठिकाणा शोधला. पोलीस पथकाने त्वरित उत्तर प्रदेशमधील जि. हतरज येथील कचौरा, ता. सिकंदरा राउ या दुर्गम भागात जाऊन आरोपी अरुणकुमार भारद्वाज याला जेरबंद केले.
आरोपीकडून पोलिसांनी ३ लाख रुपये किमतीची ३ किलो ४० ग्रॅम चांदी हस्तगत केली. हुपरी येथे आणल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.



