केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) एक मोठा निर्णय घेतलाय. आता नागरी सेवा पूर्वपरीक्षा झाल्यानंतर यूपीएससीने तात्पुरती उत्तरपत्रिका (Answer key) जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही उत्तरपत्रिका प्रकाशित केली जायची. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत परीक्षार्थीला वाट पहावी लागायची. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याची केला प्रतिसाद म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वी वरिष्ठ वकील जयदीप गुप्ता यांची अमिकस क्युरिए म्हणून नियुक्ती केली होती .तर वकील प्रांजल किशोर त्यांना सहाय्य करत होते . अमिकस क्युरिएने पूर्व परीक्षा नंतरच्या दुसऱ्या दिवशीच ही उत्तरतालिका (answer key ) प्रकाशित करावी अशी सूचना केली होती .13 मे रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकात आयोगाने असे केले तर त्याचा ‘ प्रतिकूल परिणाम ‘ होण्याची शक्यता असून परीक्षेच्या अंतिम टप्प्यात अनिश्चितता आणि विलंब होईल ‘ असा शेरा दिला होता . मात्र त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या एका नव्या प्रतिज्ञापत्रकात आयोगाने म्हटलं, सदर याचिका प्रलंबित असताना आयोगाने यावर सखोल विचार विनिमय केला असून त्यानंतर पूर्व परीक्षेनंतर तात्पुरती उत्तरपत्रिका प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे ‘ असा निर्णय कळवला .
उमेदवाराकडून हरकती मागवल्या जाणार
आयोगाने या निर्णयावर पुढे म्हटले आहे की परीक्षेला बसलेल्या उमेदवारांकडून याबाबत आक्षेप व निवेदने मागवली जातील .सर्व पैलूंचा सखोल विचार केला जाईल आणि त्यानंतर उत्तर पत्रिका अंतिम ठरवली जाईल .ही अंतिम केलेली उत्तर पत्रिका लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या निकालांच्या घोषणेचा आधार असेल .अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम उत्तरपत्रिका प्रकाशित केली जाईल असेही आयोगाने स्पष्ट केले आहे . शक्य तितक्या लवकर या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी असेही लोकसेवा आयोगाने सुचविले आहे .
याचिकेत नेमके काय म्हटले आहे?
सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत म्हटले आहे की नागरी सेवा पूर्व परीक्षेचे गुण, कट ऑफ गुण, आणि उत्तरपत्रिका ही संपूर्ण परीक्षा पूर्ण झाल्यानंतर प्रकाशित करण्याचे कोणतेही तर्कसंगत कारण नाही .त्यामुळे अपयशी उमेदवारांना योग्य व प्रभावी उपाय शोधण्याची संधी हिरावली जाते . याचिकेत पुढे नमूद करण्यात आले आहे की उत्तरपत्रिका , कट ऑफ गुण आणि उमेदवारांचे गुण त्वरित जाहीर केल्यास उमेदवारांना चुकीच्या मूल्यमापनावर अक्षय घेण्याची आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पारदर्शक करण्याची संधी मिळेल .



