करवीर तालुक्यातील सातेरी येथून देवदर्शन घेऊन परत येत असताना वाघोबावाडी ते आमशी दरम्यान मिठारीचा दरा येथील खोलदरीत चारशे फुटांवरून कार कोसळली. यामध्ये दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
दत्तात्रय पवार (वय ३२), अश्विनी दत्तात्रय (वय २८, रा. प्रगती कॉलनी, पाचगाव) अशी जखमींची नावे आहेत. सोमवारी रात्री अकरा च्या दरम्यान हा अपघात झाला.
त्यानंतर रात्रभर दोघे दरीतच जखमी अवस्थेत होते. पहाटे व्यायामसाठी गेलेल्या तरुणांना दरीमध्ये कार व जखमी अवस्थेतील दोघेजण आढळून आले. या दाम्पत्याला खोल दरीतून काढण्यासाठी तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले. साखळी पद्धतीने उतरून हाताला हात धरत या जखमींना वर काढण्यात यश आले. जखमींना उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले असून अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. करवीर पोलिसांत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय व अश्विनी पवार हे आपल्या सांगरुळ येथील मुळ गावी आले होते. तेथून ते सातेरी येथे आपल्या कारने देवदर्शनासाठी निघाले होते. रात्री उशिरा अकरा वाजता दर्शन घेऊन परत येत असताना आमशी- वाघोबा वाडी दरम्यान गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची गाडी चारशे फूट खोल दरीत कोसळली.
दरम्यान, दत्तात्रय आणि अश्विनी घरी परत आलेले नाहीत, त्यांचा फोनही लागत नाही. यामुळे नातेवाईकांनी पोलिसांत रात्री बाराच्या वेळेस हे दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. जखमींना दरीतून बाहेर काढण्यासाठी आमशी येथील जय हनुमान तालमीचे पैलवान, तरुण व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.




