मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांची दिवाळी गोड होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पावसामुळे मराठवाड्यातील शेती पिकांचे जे नुकसान झाले, त्याबद्दल शेतकर्यांना मदत म्हणून राज्य सरकारने गुरुवारी 1,346 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
याआधी जून ते ऑगस्ट महिन्यातील नुकसानीबद्दल राज्य सरकारने मराठवाड्याला 1,483 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने गुरुवारी मराठवाड्यासोबतच पुणे विभागातील सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांसाठीही एकूण 9 कोटी 47 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरसाठी 3 कोटी 18 लाख आणि सातारा जिल्ह्यांसाठी 6 कोटी 29 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा सातत्याने अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आधी जून महिन्यात नंतर जुलै व ऑगस्ट महिन्यांत शेकडो महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. त्याचे पंचनामे होऊन शासनस्तरावर मदतीचा प्रस्ताव सादर झाला. त्यानंतर लगेचच सप्टेंबर महिन्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने जून ते ऑगस्ट दरम्यानच्या नुकसानीबद्दल मराठवाड्यासाठी 1,483 कोटी रुपयांचा निधी दिला. तो निधी सध्या शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने गुरुवारी सप्टेंबर महिन्यातील नुकसानीपोटीही आर्थिक मदत मंजूर केल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
21 लाख शेतकर्यांना दिलासा
राज्य सरकारने गुरुवारी मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांसाठी नव्याने 1,346 कोटी 83 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यातून 21 लाख बाधित शेतकर्यांना मदत दिली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक 577 कोटी रुपयांची मदत बीड जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी मंजूर करण्यात आली आहे.