केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगाची घोषणा या वर्षाच्या सुरुवातीलाच केली. पण त्याच्या प्रक्रियेला सुरुवात न केल्याने कर्मचारी चिंतेत होते. कारण प्रक्रिया सुरु होण्यास जितका कालावधी लागेल. तसा 8 वा वेतन आयोग लांबणीवर पडेल. पण आता सरकार दरबारी महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. 8 व्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेतील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. या वृत्तामुळे जवळपास 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल. काय आहे ती अपडेट?
सरकारने 8 व्या वेतन आयोगासाठी नियम, अटी व शर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. माध्यमातील बातम्यानुसार, सरकारकडून नोव्हेंबर 2025 पर्यंत अधिसूचना येण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी संघटनांचा मोठा दबाव दिसून येत आहे. परिणामी 8 व्या वेतनाचा आयोगाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकार जास्त कालावधी घेणार नाही. 7 व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर सरकार तातडीने 8 व्या वेतन आयोगाबाबत निर्णय जाहीर करेल.
नवीन वेतन आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांची लवकरच नियुक्ती होईल. नोव्हेंबरपर्यंत याविषयीचे अपडेट येऊ शकतात. सध्या केंद्र सरकारने राज्य सरकार आणि अर्थविभागाकडून सूचना मागवल्या होत्या. त्याची समीक्षा सुरू आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली की, सरकार या विषयावर सक्रियपणे काम करत आहे. 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाशी संबंधित अधिसूचना योग्य वेळी सरकार जारी करेल अशी माहिती त्यांनी दिली.
कधी लागू होणार आयोग
8 वा वेतन आयोग गठीत झाल्यानंतर पुढील 3 ते 9 महिने सरकार त्याची समीक्षा करेल. 7 वा वेतन आयोग फेब्रुवारी 2014 मध्ये जाहीर झाला. 2015 मध्ये त्याचा अहवाल सादर झाला. जर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापन्याची घोषणा नोव्हेंबर मध्ये झाली तर याविषयीचा अहवाल एप्रिल 2027 पर्यंत येण्याची शक्यता आहे. जुलै 2027 मध्ये नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. 8 व्या वेतन आयोगाचा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख सेवानिवृत्तीधारकांना फायदा होईल. संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि सेवानिवृत्तीधारकांनाही त्याचा लाभ मिळेल.
दरम्यान पुढील वेतन आयोग लागू होईपर्यंत जानेवारी 2026 ते जून 2027 या 18 महिन्यांतील थकबाकी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. जर फिटमेंट फॅक्टर 2.86 टक्के गृहीत धरला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होईल. तर कर्मचारी थकबाकीतूनच मालामाल होतील. 2.86 फिटमेंट फॅक्टरच्या सहाय्याने चपराशाचा पगार 33,480 रुपयांनी वाढेल. 18 महिन्यांची थकबाकी (33,480×18) 6,02,640 रुपये मिळेल.






