मध्य प्रदेशमध्ये अनेक घरात दिवाळी आनंद नाही तर दुःख आणि चिंता घेऊन आली. कार्बाइड गन वा डेजी फायर क्रॅकर गन नावाच्या या स्थानिक उत्पादनाने 14 चिमुकल्यांची दृष्टी हिरावली आहे. गेल्या 3 दिवसांत मध्य प्रदेशातील 130 हून अधिक मुलांच्या हाती अत्यंत घातक खेळणी हातात आल्याने रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली आहे. भोपाळ, इंदुर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि विदिशा सारख्या जिल्ह्यात ही जुगाड गन सर्रास विक्री झाली. त्यामुळे अनेक घरांमध्ये दुःखाचे सावट पसरले आहे. डॉक्टरांच्या मते, जखमीमध्ये 6 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश आहे.
मध्यप्रदेशातील अनेक घरांमध्ये दिवाळीचा उत्साह होता. पण या कार्बाइड गनने या कुटुंबाचे हास्त हिसकावले. भोपाळ,इंदुर,ग्वाल्हेर, जबलपूरसह अनेक मोठ्या शहरात आणि विदिशा या जिल्ह्यात या गनने अनेक घरांमध्ये दुःखाचे सावट आहे. एकट्या भोपाळमध्येच या गनमुळे 70 हून अधिक मुलं रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. इतके घातक खेळणे बाजारात असताना महापालिका प्रशासन, अग्निशमन दल आणि इतर प्रशासकीय अधिकारी झोपेत होते का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या मुलांवर हमीदिया, जेपी, सेवा सदन आणि एम्स या रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील अनेक मुलांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
कशी तयार होते कार्बाइड गन?
कार्बाइड गन हे देशी जुगाड मानण्यात येते. या गनमध्ये कॅल्शियम कार्बाइड, प्लास्टिक पाईप आणि गॅस लायटरचा वापर करण्यात येतो. कार्बाइड जेव्हा पाण्याच्या संपर्कात येते. तेव्हा त्यापासून ॲसिटिलीन गॅस तयार होतो. ठिणगी पडताच ही गन धमाका करते. पण धमाक्यामुळे प्लास्टिक पाईपचे तुकडे, छर्रे मोठ्या वेगाने बाहेर पडून डोळ्यात, चेहऱ्यावर आणि शरीराला इजा पोहचवतात. ही गन बाजारात 150 रुपयांना मिळते. या 150 रुपयांच्या गननेच 14 मुलांचे भावी आयुष्य अंधकारमय केले आहे. डॉक्टरांच्या मते हे काही साधं खेळणं नाही तर एक घातक शस्त्र आहे. ते असे खुलेआम बाजारात विक्री होत असल्याने आता संतापाची लाट उसळली आहे.
हमीदिया रुग्णालयातील 14 वर्षीय हेमंत पंथी आणि 15 वर्षीय आरिस या मुलांच्या आई-वडिलांच दुःख अनेकांचे मन हेलावून टाकणारे आहे. आरिसचे वडील सरीख खान यांनी मुलांच्या हट्टामुळे ही गन घेतल्याचे सांगितले. पण हे खेळणे इतके घातक असेल असे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहरे. तर राज विश्वकर्मा या मुलाने सांगितले की सोशल मीडियावर पाहुन त्याने गन तयार केली आणि स्फोटानंतर त्याची दृष्टी गेली. याप्रकरणी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 18 ऑक्टोबर रोजीच प्रशासनाला कार्बाइड गन विक्री थांबवण्याचे आदेश दिले होते. तरीही हा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.






