‘बिग बॉस 19’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. प्रेक्षक या शोच्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडची प्रतीक्षा करत असतात. या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची शाळा घेतो, काहींना सल्ले देतो आणि त्यानंतर पार पडतं एलिमिनेशन. या आठवड्यात प्रणित मोरे, नेहल चुडासमा, बसीर अली आणि गौरव खन्ना यांच्यापैकी एकाचा पत्ता कट होणार होता. परंतु निर्मात्यांनी ‘डबल एविक्शन’ म्हणजेच दोन जणांचं एलिमिनेशन करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या वीकेंड का वार एपिसोडमध्ये एक नव्हे तर दोन सदस्य घराबाहेर पडले.
सलमान खानने या डबल एविक्शनच्या आठवड्यात दोन सदस्यांना घरातून बाहेर काढलं. परंतु आधी त्यापैकी एकाला सीक्रेट रुममध्ये पाठवण्याची योजना होती. परंतु अखेरच्या क्षणी मोठा बदल करत थेट दोघांना बेघर केलं. नेहल चुडासमा आणि बसीर अली या दोघांचा बिग बॉसमधील प्रवास संपुष्टात आला. या निर्णयामुळे फक्त बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकच नाही तर प्रेक्षकसुद्धा थक्क झाले. निर्मात्यांनी स्पष्ट केलं की, सीक्रेट रुमबद्दल विचार करणाऱ्या चाहत्यांना आम्ही सांगू इच्छितो की या आठवड्यात कोणताच सीक्रेट रुम ड्रामा होणार नाही.
रविवारच्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये गायक मिका सिंगने हजेरी लावली होती. यावेळी त्याने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना एक टास्क दिला. आतापर्यंत शोमध्ये हिट आणि फ्लॉप ठरलेल्या स्पर्धकांची नावं चार्टवर लिहा, असं तो त्यांना सांगतो. हिट ठरलेल्या स्पर्धकांमध्ये कुनिका सदानंद, गौरव खन्ना आणि तान्या मित्तल यांचा समावेश होत. तर फ्लॉप सदस्यांमध्ये नेहल चुडासमा, फरहाना भट्ट यांचं नाव लिहिलं जातं. तर मृदुलला कोणताच हिट किंवा फ्लॉपचा टॅग देण्यात आला नाही.
एलिमिनेशनच्या टास्कमध्ये नॉमिनेट झालेल्या चार स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला. या टास्कदरम्यान स्पर्धकांना त्यांचा सर्व राग काढण्याची संधी दिली जाते. त्याआधारे एलिमिनेशन ठरवण्यात आलं. सर्वांत आधी गौरव खन्ना बॉक्सिंग बॅगवर पंच करत नेहलवर निशाणा साधतो. त्यानंतर प्रणित मोरे आपलं मत मांडत फरहाना भट्टला लक्ष्य करतो. प्रणितनंतर बसीर आणि नेहल वेटिंग मशीनजवळ येतात. तेव्हा नेहल रडू लागते. त्यानंतर नेहल आणि बसीर यांना घराबाहेर काढलं जातं.

