Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील रुग्णांसाठी आनंदाची बातमी: आता 'खासगी' रुग्णालयांतही 108 ची सुविधा, अशी असेल...

महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आनंदाची बातमी: आता ‘खासगी’ रुग्णालयांतही 108 ची सुविधा, अशी असेल नवी सेवा

महात्मा फुले जन आरोग्य योजनेसह सरकारी योजना राबवणाऱ्या खासगी व धर्मादाय रुग्णालयांमध्ये 108 रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून पावलं उचलण्यात आली आहेत.

 

रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा (108 रुग्णवाहिका) विस्तार करून रुग्णवाहिकांचे एकत्रित संचलन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

राज्यात आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून 102, 104 आणि 108 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून मोफत सुविधा दिली जाते. सद्यस्थितीत राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून सुविधा देण्यात येते. आपत्कालीन स्थितीत रुग्णाने विनंती केली तर जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल केलं जातं. परंतु, खासगी रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णाला दुसऱ्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी ही सुविधा देण्यात येत नाही.

 

सरकारी रुग्णालयांमधून दुसऱ्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं जातं. परंतु, अनेकदा आपत्कालीन परिस्थितीमध्ये गंभीर रुग्णांना लागणाऱ्या सुविधा सरकारी रुग्णालयांत उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्णांना कुठे दाखल करायचं, असा प्रश्न उपस्थितीत होतो. तसंच काही रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी इच्छा असते. यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजना व सरकारी योजना लागू असलेल्या रुग्णालयांतही सुविधा सुरू करण्याचा विचार आरोग्य विभागाकडून केला जात आहे.

 

तातडीने मदत मिळणार

सरकारच्या नव्या निर्णयामुळे रुग्णांना तातडीने मदत मिळणार असून, योजनांचाही लाभ मिळू शकतो, असं आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राज्यात आरोग्य विभागासह अन्य विभागांकडून रुग्णवाहिकांची सेवा दिली जाते. या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित संचलन करण्याचाही विचार केला जात आहे. राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांत सरकारी योजना लागू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. काही रुग्णालयांनी योजना लागू करण्यााला विरोध केला असून धर्मादाय रुग्णालयांना योजना लागू कराव्या लागतील, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -