येथील अयोध्या कॉलनीमध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या बंगल्यातील चोरीचा छडा लावत शिवाजीनगर पोलिसांनी चोरीस गेलेले रोकडसह 10 तोळे सोने, 1 किलो चांदी असा सुमारे 11 लाख 16 हजारांचा ऐवज हस्तगत केला.
याप्रकरणी आकाश राजेंद्र देशिंगे (वय 22, रा. शहापूर) या सराईत चोरट्यासह अविनाश ऊर्फ मनोज विजय वाघमोरे (28, रा. पाचोड, जि. छत्रपती संभाजीनगर) या दोघा चोरट्यांना अटक केली आहे. याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी दिली. यावेळी पोलिस उपअधीक्षक विक्रम गायकवाड, पो. नि. शिवाजी गायकवाड उपस्थित होते.
अयोध्या कॉलनीतील विमलादेवी केसरवाणी यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचे शनिवारी उघडकीस आले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन यासह तांत्रिक तपासाद्वारे सराईत चोरटा देशिंगे व वाघमोरे यांना अटक करण्यात आली.
घरातच मिळाले दागिने
देशिंगे याच्यावर यापूर्वीही चोरीचा गुन्हा दाखल आहे. दोघांनीही चोरी नंतर दागिन्यांची वाटणी केली होती. वाटणीला आलेले दागिने दोघांनीही घरातच ठेवले होते. हे दागिने पोलिसांच्या हाती लागले आहेत. दोघेही काही दिवसांतच दागिन्यांची विक्री करण्याच्या तयारीत होते. झटपट श्रीमंत होण्यासाठी दोघांनीही चोरी केल्याचेही तपासात उघड झाले आहे.




